कोपरगाव तालुका
पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत द्या आमदार आशुतोष काळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव विधानसभा मतदार संघात गत आठवड्यापासून पडत असलेल्या परतीच्या पावसाचा सोयाबीन, बाजरी, मका, कापूस तसेच भाजीपाला आदी पिकांना फटका बसला आहे. शेतात काढून पडलेल्या सोयाबीन, बाजरी, या पिकांना मोड फुटले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी कोपरगाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठलेल्या निवेदनात केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या चक्रव्युहात बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना यावर्षी पिकांना आवश्यक असलेला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्न मिळण्याची खात्री होती मात्र आजपर्यंत कधी एवढा न झालेल्या परतीच्या पावसाने सर्वच पिकांची नासाडी केली आहे. या पावसामुळे काढणी झालेल्या पिकांना शेतातच मोड फुटले आहे.
आ. काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, चालू वर्षी कोपरगाव विधानसभा मतदार संघात पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन, बाजरी, मका, कापूस आदी पिकांची पेरणी केली होती. पावसाचा लहरीपणा सहन करीत पिके कशीबशी काढणीला आली होती. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले असून सोयाबीन, बाजरी, मका, कापूस आदी पिकांसह डाळिंब, द्राक्ष आदी फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
मागील काही वर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरी दुष्काळाच्या चक्रव्युहात बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना यावर्षी पिकांना आवश्यक असलेला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्न मिळण्याची खात्री होती मात्र आजपर्यंत कधी एवढा न झालेल्या परतीच्या पावसाने सर्वच पिकांची नासाडी केली आहे. या पावसामुळे काढणी झालेल्या पिकांना शेतातच मोड फुटले आहे. हजारो हेक्टर शेती पिकासह पाण्यात असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी सण साजरा होणार नाही अशी परिस्थिती संपूर्ण कोपरगाव मतदार संघात आहे. प्रशासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा व झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी शेवटी केली आहे.