कोपरगाव तालुका
आ.काळेंचा सत्कार कोल्हेंच्या का जिव्हारी लागला ?- सवाल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोविडच्या संकटात चांगले काम केल्याबद्दल भाजपाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी कोपरगावचे आ.आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि मुख्याधिकारी यांचा सत्कार केला त्यामुळे कोल्हे गटाच्या पोटात खोल दुखू लागले असून काही फितुराना हाती धरून गरळ ओकण्याचे काम सुरु केले असले तरी त्याने वास्तव बदलणार नसल्याची टीका भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
त्यानी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”आ.काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरी ते या तालुक्याचे म्हणजे सर्वांचेच आमदार आहेत.व पदाधिकारी हा जनतेसाठी कोणत्याही पक्षाचा नसतो.हे ज्यांना माहिती नाही त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलेले उत्तम.पण या उलट त्यांचा सत्कार केल्याने ” कोल्हे ” यांचे पित्त खवळले.आम्ही कोल्हे यांचाही सत्कार केला असता पण तुम्हाला आमच्याकडून झालेला सत्कार चालणार नाही हे आम्हाला माहित आहे.तुम्ही भाजपा पदाधिकारी सुनील वाणी यांना हाताशी धरून जुन्या भाजपा कार्यकर्त्यांविरुद्ध पत्रक काढले कि सत्कार करणाऱ्यांचा भाजपाशी काहीच संबंध नाही.पदाच्या तुकड्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपात घुसलेल्यानी भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांबद्दल बोलू नये.कोल्हे यांना आ. काळे यांच्याबद्दल इतका द्वेष असतांना त्यांनी जिल्हा बँकेचे संचालकपद पदरात पाडून घेण्यासाठी आ.काळे यांचेशी चुंबाचुंबी का केली ? तुम्ही अजूनही खा.सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात राहिलेले चालते ते कसे ? हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेवर टिका करणारे खा.शरद पवार यांचे विरुद्ध बोलून दाखवा.धमक असेल तर सहकारी संस्थांच्या निवडणुकीत आ.काळे यांना विरोध करूनच दाखवा.भाजपाचे खरे निष्ठावान कोण हे जनतेला माहित आहे.तुम्ही भाजपाच्या प्रदेश पदाधिकारी आहात,तुम्ही जुन्या-एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर कारवाई करा.तालुक्यात व शहरातील विकासकामे करायची सोडून द्वेषाचे राजकारण करू नका.तुम्ही अजून किती दिवस भाजपात रहाणार हे आधी जाहिर करा असे आवाहन शेवटी माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,योगेश वाणी,चेतन खुबानी,किरण वडनेरे,संजय कांबळे,मनोहर कृष्णानी,पी.एम.पाटील आदींनी भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालयाच्या वतीने जाहीर केले आहे.