कोपरगाव तालुका
इंधनवाढी विरोधात कोपरगावात राष्ट्रवादीचे आंदोलन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील काही दिवासांपासून पेट्रोल.डीझेल व घरगुती स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असून त्या निषेधार्थ सोमवार (दि.१७) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने कोपरगाव येथे पेट्रोल पंपापर्यंत दुचाकी ढकलून नेत पेट्रोल पंपावर पेट्रोल देणाऱ्या सेल्समनला गुलाब पुष्प देवून गांधीगिरी करत निषेध आंदोलन करण्यात आले.
सदर प्रसंगी वाल्मिक लहिरे, आकाश डागा, संदीप सावतडकर, बाला गंगूले, महेश उदावंत, संतोष दळवी, ऋषिकेश खैरनार, पप्पू गोसावी, विकी जोशी, सचिन कुडके, शुभम शिंदे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.
देशात व राज्यात २०१४ पर्यंत आघाडीचे सरकार असतांना पेट्रोलचे दर ६० रुपये प्रतीलिटर,तर डिझेलचे दर ५० रुपये प्रतीलिटरच्या आसपास होते तर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरची टाकी ३५० ते ४०० रुपयांना मिळत असतांना त्यावेळी भाजप पक्षाने महागाई वाढल्याचे खोटे चित्र निर्माण केले होते. याच भाजपाने महागाई कमी करून,अच्छे दिन येणार अशी खोटी स्वप्ने दाखवून जनतेची सहानुभूती संपादन करून सत्ता मिळविली. तेव्हापासून आजतागायत पेट्रोल, डीझेल, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरचे दर हे गगनाला भिडले असून प्रचंड प्रमाणात महागाई वाढली आहे. मात्र वाढलेल्या महागाईचे केंद्र सरकारला सोयरसुतक नसून केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल देणाऱ्या सेल्समनला गुलाब पुष्प देवून गांधीगिरी करत केद्र सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी यावेळी सांगितले. जीवघेण्या कोरोना संकटात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असून दैनंदिन पेट्रोल-डिझेल व गॅस सिलेंडरच्या होत असलेल्या दरवाढीचा परिणाम हा नागरिकांच्या जीवनावर होवून त्यांना जगणे असह्य झाले आहे याची जाणीव केंद्र सरकारला व्हावी यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे राष्ट्रवादी युवक चे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी यावेळी सांगितले.