गुन्हे विषयक
कोपरगावात कत्तलखान्यात जाणारी जनावरे पकडली,1.58 लाखांचा ऐवज जप्त
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात गत ऐन गणेशोत्सवात गोवंशाची चालत असलेली मोठी कत्तल नगर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी उघड केल्यानंतरही वर्षभरात अनेक वेळी पोलिसांनी धाडी टाकूनही उपयोग झालेला दिसत नसून शहर पोलिसांनी काल पुन्हा एकदा बैल बाजारतळ परिसरात धड टाकून एक लाख 58 हजार रुपये किमतीचे बावीस गोवंश जातीचे जनावरे मिळालेल्या गुप्त खबरीवरून जप्त केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरात गत वर्षी गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर कत्तलखाना सुरु असल्याची खबर मिळाली होती त्या नुसार नगर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने सदर ठिकाणी आठ दिवस पाळत ठेऊन मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा माल जप्त करून आरोपीना गजाआड केले होते यात संगमनेर येथील काही व्यापारी गुंतले होते व ते कोपरगावात कत्तल करून हा माल गुजरातला रवाना करत असल्याचे उघड झाले होते.मात्र वर्षभर अधून मधून हि कारवाई सुरूच राहिली तरीही हे गुन्हेगार बधत नाही या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव बाजारतळ परिसरातील काटवनात कत्तलीसाठी सुमारे बावीस गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी लपवुन ठेवली असल्याची खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर याना मिळाली त्यांनी आपले कनिष्ठ सहकारी तथा पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे व सहकाऱ्यांना या बाबत खबर देऊन सदर ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बावीस सप्टेंबर रोजी त्यांनी साडेपाच वाजेच्या सुमारास धाड टाकली असता त्यांना त्या काटवनात भुकेल्या तहानलेल्या स्थितीत 81 हजार रुपये किमतीच्या नऊ भाकड गाई,तीन हजार रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची खिलारी गाय, आठ हजार रुपये किमतीची तांबडी पांढरे रंगाची तीन वर्ष वयाची भाकड गाय, अशा सुमारे बावीस गायी ,गोऱ्हे, वळू असा एक लाख 58 हजारांचा ऐवज जप्त केला असून सदरच्या जागेचा व प्राप्त मालाचा पंच व साक्षीदारांसमोर पंचनामा करून सदरचे गोवंश जनावरे जप्त करून कोकमठाण या ठिकाणी गोशाळेत रवानगी केली आहे.व अज्ञात इसमाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ.अंबादास रामनाथ वाघ यांनी गु.र.नं.327/2019 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1)व महाराष्ट्र पशु संरक्षक अधिनियम 1995 चे कलम 5 (ब),9 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.दरम्यान येथील व्यापाऱ्यांनी पुन्हा आपला गुजरात मार्ग चालू केला कि काय अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.