नगर जिल्हा
बेलापूरच्या डॉ निर्भयने फिलिपाईन्स मध्ये वाचवले अपघातग्रस्त मुलीचे प्राण
September 15, 2019
340 1 minute read
संपादक (नानासाहेब जवरे)
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
फिलिपाईन्स मधील दवाओ येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या पत्रकार नवनाथ कुताळ यांचा मुलगा डॉ निर्भय याने दोन वाहनांच्या अपघातात जबर जखमी झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीला मदत करून प्राण वाचवल्याबद्दल तेथील सोशल मीडियावर ग्रेट हिरो म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे
या बाबत सविस्तर माहिती अशी की,नवनाथ कुताळ यांचा मुलगा फिलिपाईन्स मध्ये दवाओ शहरातील डीएमएसएफ वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.गुरुवार दि १२ रोजी तो नेहमीप्रमाणे महाविद्यालयात निघाला होता.त्यावेळी एका चारचाकी वाहनाने तीनचाकी वाहनाला जोरदार धडक दिली.त्यातून एक १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी बाहेर फेकली गेली.अपघात झाल्यानंतर घाबरून दोन्हीही वाहन चालक आपली वाहने घेऊन पळून गेले.त्यावेळी निर्भय हाही महाविद्यालयात चालला होता.तात्काळ तो तिच्याकडे धावत गेला.मुलगी वेदनेने विव्हळत होती.नेहमीप्रमाणे लोक फक्त बघत होते.तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यासाठी हालचाली केल्या. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका गाडीला त्याने थांबवले. योगायोगाने त्या गाडीत बालरोगतज्ज्ञ डॉ रोसेन क्रुझ लॅरेंटे चालल्या होत्या.त्यांच्या मदतीने त्याने जवळच असलेल्या स्वतःच्या महाविद्यालयातील डीएमएसएफ रुग्णालयात दाखल करून तिच्यावर वेळीच योग्य ते उपचार केले. तिच्या छातीला,हाताला, तोंडाला जबर मार लागलेला होता. सदर मुलीचे नाव जॉयसी असून त्याच शहरात सिटी हायस्कुल मध्ये शिकते आहे.त्या गाडीत असणाऱ्या डॉ रोसेन यांनी फक्त घाईत त्याचे नाव व कुठल्या महाविद्यालयात शिकतो एवढे विचारले होते.अपघातग्रस्त मुलीवर योग्य ते उपचार करून निर्भय महाविद्यालयात व डॉ रोसेन निघून गेले.मात्र डॉ रोसेन यांच्यातील डॉ व माणूस मात्र जागाच राहिला. त्यांनी निर्भयची माहिती मिळवली. व त्याच्या मानवतापूर्वक मदतीबद्दल अभिनंदन व कौतुक करणारी माहितीही सोशल मीडियावर टाकली. त्यावर फिलिपाईन्स मध्ये त्यांचेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.सदर मुलीच्या नातेवाईकांनीही त्याचे आभार मानून सोशल मीडियावर कौतुक केले आहे.भारत मातेचे सुपुत्र जगात कोठेही गेले तरी भारतीय संस्कृती व संस्कार विसरत नाही हे नक्की
दरम्यान डॉ निर्भय सोबत अनेक भारतीय मुले मुली शिक्षण घेत आहेत.हे सर्वजण मिळून तेथेही गणेशोत्सव, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन,रक्षाबंधन आदींसह भारतीय संस्कृतीचे सण उत्सव उत्साहात साजरे करतात.आणि विशेष म्हणजे या सर्व सण उत्सवात तेथील विद्यार्थी, नागरिक उत्साहाने सहभागी होऊन भारतीयांचा आनंद द्विगुणित करतात.