गुन्हे विषयक
अवैध वाळूचोरी,कोपरगावात एक गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध वाळू उपसा करण्यास प्रतिबंध घातलेला असतानाही कोपरगाव औद्योगिक वसाहती नजीक मनाई वस्ती कचरा डेपोजवळ गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करताना आरोपी रमेश पोपट माळी (वय-२४) रा.मनाई संवत्सर हा दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉ.राहुल भाऊसाहेब साळुंके यांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.मनाई वस्ती भागात मोठे काटेरी झुडपे असल्याने हि वाळू काढण्यास मोठी सुरक्षा प्राप्त होताना दिसून येते.याचाच फायदा सध्या वाळूचोर घेताना दिसत आहे.या ठिकाणी अवैध वाळूचोरी मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना आपल्या गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली आहे.त्या नुसार काल दुपारी एक वाजेच्या सूमारास शहर पोलिसानी कोपरगाव नगरपरिषदेच्या कचरा डेपोजवळ धाव घेतली असता हा प्रकार उघड झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातून पूर्वमुखी गोदावरी नदी वाहते.या नदीतून अवैध वाळू उपसा करण्यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ व जिल्हाधिकारी अ,नगर यांनी प्रतिबंध घातलेले आहे.तरीही प्रचंड मिळणारा पैसा या नदीकाठच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वस्थ बसू देत नाहीत हे वास्तव आहे.त्यामुळे झटपट मिळणाऱ्या पैशाच्या मोहाने अनेक तरुण या व्यवसायाकडे आकर्षित होतात.सध्या नदीपात्राची पाण्याची पातळी घटली आहे.बऱ्याच ठिकाणी वाळू उघडी पडली आहे.त्याचा फायदा वाळूचोरांनी न उचलला तर नवल.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.मनाई वस्ती भागात मोठे काटेरी झुडपे असल्याने हि वाळू काढण्यास मोठी सुरक्षा प्राप्त होताना दिसून येते.याचाच फायदा सध्या वाळूचोर घेताना दिसत आहे.या ठिकाणी अवैध वाळूचोरी मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना आपल्या गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली आहे.त्या नुसार काल दुपारी एक वाजेच्या सूमारास शहर पोलिसानी कोपरगाव नगरपरिषदेच्या कचरा डेपोजवळ धाव घेतली असता त्या ठिकाणी एक विना क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रॅक्टर आढळून आला आहे.त्याला निळ्या रंगाची विना क्रमांकाची डम्पिंग ट्रॉली आढळून आली आहे.त्यात काही वाळू आढळून आली आहे.हा ट्रॅक्टर त्याच परिसरात असलेल्या आरोपी रमेश पोपट माळी याचा असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.७८/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.व ट्रॅक्टर व ट्रॉली असा ०४ लाखांचा अवैज जप्त केला आहे.पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ए.एम.दाकुंडे हे करीत आहेत.त्यामुळे अवैध वाळूउपसा करणाऱ्या असामाजिक तत्वात खळबळ उडाली आहे.