आरोग्य
श्रीरामपुरात कोरोना वाढीचा वेग मंदावला
जनशक्ती न्यूजसेवा
बेलापूर-(प्रतिनिधी)
श्रीरामपुर तालुक्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर दिवसाला शंभर पर्यंत जाऊन पोहोचला होता त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच चिंता वाढली होती मात्र आता येत्या दोन तीन दिवसात रुग्ण वाढीची संख्या घटल्याने सर्वांना दिलासा मिळाला असली तरी नवीन कोविड केंद्राची नितांत गरज निर्माण झाली आहे.
श्रीरामपूर शहरात सुसज्ज असे कोविड सेंटर व्हावे यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील आहे. मात्र त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे-अनुराधा आदिक,अध्यक्षा श्रीरामपूर नगरपरिषद
काही दिवसांपूर्वी श्रीरामपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला शंभर होत होती. त्यात तालुक्यातील काही पत्रकार, राजकीय पदाधिकरी,व्यापारी, प्रतिष्ठित व्यक्तींचा बळी गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या होत्या.कोरोना रुग्ण दाखल करायला रुग्णालयात जागा शिल्लक नव्हती,त्यातच ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला होता. नगरला रुग्ण पाठवले तर तेथेही बेड उपलब्ध होईल याची खात्री नसायची. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच चिंता वाढली होती.या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीत श्रीरामपुर शहर सात दिवस लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यातही राजकारण आले,मतमतांतरे झाले,काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवले तर काहींनी चालू ठेवले.दुकाने बंद अन लोक रस्तावर अशी परिस्थिती मात्र बघायला मिळाली.चहाच्या टपरीवर मोठया संख्येने घोळक्याने एकत्रित येऊन चहाचा आस्वाद घेणारे चहा शौकीनही काही कमी नाहीत.मात्र अशाही परिस्थितीत श्रीरामपुर तालुक्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे.हा वेग शंभर वरून सध्या तीस पर्यंत आला आहे.मात्र नागरिकांनी आता विशेष काळजी घेतली पाहिजे असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.शहरात सध्या शासनामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, संत लूक रुग्णालय,आ. लहू कानडे यांच्या निधीतुन श्रीरामपुर ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या आय.सी.यू. रुग्णालयात तसेच मोरगे हॉस्पिटल व युनिटी हॉस्पिटल या दोन खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे.
दरम्यान कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने त्वरित कोरोना चाचणी केंद्र, कोरोना तात्पुरते रुग्णालय सुरू करणे गरजेचे आहे. नगरपालिका प्रशासन दिरंगाई करत असेल तर “नगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी” आंदोलन करणार असल्याचे जनविकास आघाडीचे केतन खोरे, बाळासाहेब गोराणे,भाजयुमोचे विशाल यादव, अक्षय वर्पे यांनी जाहीर केले आहे.त्यांनी म्हटले आहे,श्रीरामपूर नगरपालिकेने सर्वसामान्य कोरोना बाधित रुग्णांसाठी चाचणी केंद्र व तात्पुरते रुग्णालय सुरू करावे म्हणून आम्ही दीड महिन्यांपासून मागणी करत आहोत. एकीकडे अहमदनगर महानगरपालिका, संगमनेर, देवळाली प्रवरा नगरपालिका, शिर्डी नगरपंचायतने तेथील नागरिकांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर श्रीरामपूर नगरपालिका प्रशासन मात्र वेळकाढूपणा करत आहे.
दरम्यान नगरपरिषदेच्या अध्यक्षा अनुराधा आदिक यावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की,”श्रीरामपूर शहरात सुसज्ज असे कोविड सेंटर व्हावे यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील आहे. मात्र त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. फक्त सूचना केल्या,उपदेश केला व वर्तमान पत्रात बातम्या प्रसिध्द केल्या म्हणजे आपले काम संपले असे होत नाही. असे न करता सर्वांनी मिळून जबाबदारी घेतली तर शहरवासियांसाठी मोठे सुसज्ज कोविड सेंटर सर्वांच्या मदतीने आपण उभारू शकतो,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. शहरातील व्यापार्यांनी आपआपली दुकाने, व्यवसाय बंद ठेवले व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.