कोपरगाव तालुका
उपकारागृहाची भिंत फोडून आरोपींचा पळण्याचा प्रयत्न !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उपकारागृहात विविध गुन्ह्यात बंद असलेल्या चार आरोपीनी कारागृहाची भिंत फोडून त्यातून पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी तातडीने भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.व परिस्थितीतवर नियंत्रण मिळवले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चार आरोपी अनिल ज्ञानदेव शिंदे (वय-२३) राहाता,नारायण रामप्रसाद बसनेत (वय-२७) नाशिक,किरण उर्फ अंथोनी छगन सोनवणे (वय-३२) रा.नाशिक,विकी विष्णू चावरे (वय२९) रा.राहाता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान यापूर्वी वायकर या कुप्रसिद्ध टोळीतील सदस्यांनी याच उपकारागृहातून खिडकीचे गज कापून पळून जाण्यात यश मिळवले होते त्यावेळी कर्तव्यावर असलेले चार पोलीस कर्मचारी बडतर्फ करण्यात आले होते.त्यानंतरही एकदा अन्य आरोपीनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो फसला होता.अलीकडील तेरा वर्षाच्या काळात हि तिसरी घटना आहे.त्यातच हे कारागृह जुने ब्रिटिश काळातील असून ते कालबाह्य झाले आहे तहसीलची नवी इमारत झाली मात्र त्यात कारागृहाची व्यवस्थाच असल्याने या घटना वारंवार होत असल्याचे मानले जात आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीत जुने उपकारागृह असून या सात बाराक आहे.यात या वरील चार आरोपींना ठेवण्यात आले होते.मात्र मंगळवार दि.१२ ऑगष्ट रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास पाच क्रमांकाच्या बाराक मध्ये असताना आपापसात कट रचून सौचालयाच्या मागील बाजूस असललेल्या भिंतीला काही अज्ञात हत्यारांनी छिद्र पाडून पोलिसांच्या राखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र हि बाब काही चाणाक्ष पोलिसांच्या लक्षात आल्याने अनर्थ टळला आहे.हे चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत बंद आहे.त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.४६५/२०२० भा.द.वि.कलम २२४,४२७,१२०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.