जाहिरात-9423439946
आंदोलन

…’त्या’ बळीचे मोल बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्गात करणार का?

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

   उत्तर भारतीयांना दक्षिण भारताशी जोडण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याचे दुर्दशेचे रोज नवे अवतार समोर येत असून त्यात आणखी एका विद्यार्थ्यांचा बळी गेला असून एक सुदैवाने बचावला आहे.मात्र संतप्त ग्रामस्थानी या घटनेविरोधात,”रास्ता रोको” करून आपल्या भावनांना काल ग्रामस्थानी वाट मोकळी करून दिली होती.उशिराने अहिल्यानगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे संगमनेर येथील कार्यकारी अभियंता एस.आर.वर्पे यांनी उद्या घटनास्थळाला भेट देण्याचे आणि रस्त्याची दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने अखेर ते आंदोलन संपविण्यात आले होते.आज त्यांनी आपला शब्द पाळला असून रस्त्याचे सहा कि.मी.रस्त्याचे काम सुरू केले असल्याचे दिसून आले आहे.याबाबत ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.मात्र झगडे फाटा ते वडगाव पान हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करावा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे नानासाहेब जवरे यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वर्पे यांचेसह राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याची मागणी करताना कार्यकर्ते.

दरम्यान यावेळी या मार्गांवरून आता शिर्डीची अवजड वाहतूक बंद केली असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी दिली असल्याची माहिती आंदोलनकर्ते यांनी दिली आहे.संबंधित ठेकेदार माळवदे याला सदर काम चौदा दिवसात करण्याचे फर्मान दिले असल्याचे समजले आहे.त्यामुळे सदर काम आता कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”शिर्डीची अवजड वाहतूक गेली अनेक दशके झगडे फाटा ते वडगाव पान याच मार्गावरून शिर्डीच्या गर्दीच्या काळात सुरू ठेवली होती.शिर्डी बाह्यवळण रस्ता होण्याच्या आधी आणि आजही गर्दी आणि महोत्सव काळात त्याचा वापर होत आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक आदेश देण्यात कायम आघाडीवर असतात मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत कोणालाही कणव असल्याचे दिसून येत नाही.लोकप्रतिनिधी यावर लक्ष द्यायला तयार नाही.आगामी वर्षी नाशिक येथे दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभ मेळा संपन्न होत आहे.त्यासाठी नाशिक आणि नजीकची देवस्थाने आणि तीर्थस्थाने सहा आणि चार पदरी होणार आहे.त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तीस हजार कोटींची मोठी आर्थिक तरतूद केली आहे.मात्र शिर्डीला जोडणारा रस्ता हा नांदुर शिंगोटे-तळेगाव दिघे मार्गे गोगलगाव लोणी निर्मळ पिंपरी मार्गे केला जातो हे मोठे आश्चर्य मानले जात आहे.त्याचे समर्थन प्रशासकीय अधिकारी राजकीय दबावातून राजरोस करताना दिसत आहे.मात्र सर्वात जवळचा पालखी मार्ग असलेली वावी वरून सायाळे-जवळके हा दुष्काळी भागातून जाणारा मार्ग जाणीवपूर्वक केला जात नाही.शिवाय ज्या मार्गावर आज सकाळी अपघात झाला त्याची दुरावस्था ही शिर्डीची गर्दीच्या काळात होणारी अवजड वाहतूक याच मार्गाने झाल्याने झाली आहे.त्यातून अनेक बळी गेले आहे.कालची घटना याच दुर्लक्षाने झाली आहे हे येथे विसरता येणार नाही.त्यामुळे काल ग्रामस्थांचा संताप बाहेर पडला होता.त्यावेळी पोलिस आणि तालुका प्रशासनास त्यांनी जेरीस आणले होते.अखेर चार तासांनी ते आंदोलन काम सुरू करण्याच्या बोलीवर संपविण्यात आले होते.आज कधीच शब्द न पाळणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचा शब्द पाळला असल्याचे दिसून आले आहे.त्यावेळी ग्रामस्थानी सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नगर-मनमाड व नाशिक पुणे आदी दोन राष्ट्रीय महामार्ग आहे.मधील तीस कि.मी.चा हा उपेक्षित मार्ग राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करावा अशी मागणी लावून धरली आहे.त्यावेळी अधिकारी हताश असल्याचे दिसून आले आहे.नेत्यांच्या गडावर जाण्यास रस्ते राष्ट्रीय महामार्ग होतात.मात्र ज्या शिर्डी तीर्थ क्षेत्रामुळे या मार्गावर अपघात होऊन शेकडो ग्रामस्थांचे आणि प्रवाशांचे बळी जात आहे.त्याबाबत पालकमंत्री आणि शिर्डी येथील साई संस्थानं काही करण्यास तयार नाही हे विशेष ! दुष्काळी भागावर साई संस्थानने कायम सापत्न पणाची वागणूक दिली आहे.सर्व साई दिंड्या मधील मार्गाने जात असताना या मार्गावर साई संस्थान दमडी खर्च करण्यास तयार नाही.मात्र अन्यत्र मात्र शासनालाच दत्तक घेण्याची संस्थांनची तयारी असल्याचे वारंवार दिसून आले आहे.त्यामुळे निदान आपल्या पर्यायी वाहतुकीमुळे या नागरिकांचे बळी गेले याचा थोडा तरी खेद बाळगून साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या मार्गास तरतूद करावी.शिर्डीत देशातील सर्व महत्वाचे नेते येत असताना त्यांचे या मार्गाकडे दुर्लक्ष होत आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने वारंवार याकडे लक्ष वेधून घेतलं आहे.मात्र साई संस्थान आणि त्यांचे प्रशासन ढिम्मच आहे.

दरम्यान हा झगडे फाटा ते वडगाव पान रस्ता करण्यासाठी आपण केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले असून आगामी काळात त्याबाबत पाठपुरावा करून हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करू असे आश्वासन शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

   दरम्यान यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागही कार्यकारी अभियंता वर्पे यांनी रांजणगाव देशमुख येथून खराब सहा किमीचा रस्ता मंजूर झाला आहे.त्यातील तीन किमी रस्ता झाला आहे.उर्वरित काम माळवदे या ठेकेदारास दिले आहे.त्यांनी आधी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.खड्डे बुजवून झाल्यावर लगेच रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.त्यांचे समवेत कोपरगाव उपविभागीय अधिकारी वर्षराज शिंदे,कनिष्ठ अभियंता श्री चौधरी आदी उपस्थित होते.
 
   सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,सचिव कैलास गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,गोदावरी दूध संघाचे माजी संचालक यशवंत गव्हाणे,सुशील औताडे,राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष ॲड.रमेश गव्हाणे,बाळासाहेब गव्हाणे,माजी सरपंच ध्यानदेव गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,सागर गाढे,जवळके ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वाल्मीक भोसले,पोलिस पाटील सुधीर थोरात,विजय कोटकर,शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल श्री.गोराने आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close