क्रीडा विभाग
राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत हरियाणा संघ अजिंक्य !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय ६९ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धा आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हरियाणा संघाने अजिंक्यपद पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात कडवी झुंज देत महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक मिळून रजत पदक पटकावले.तर राजस्थान संघाने तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदकाची कमाई केली आहे.

“त्वरित निर्णय क्षमता,प्रेरणा व सांघिककार्य हे आज अंतिम सामन्या दरम्यान बघायला मिळाले.खेळामुळे हे गुण विकसित होतात,म्हणूनच खेळाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे”-सुष्मिता विखे,कोकमठाण.
अंतिम सामना हरियाणा व महाराष्ट्र संघ यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला पहिल्या हाफ मध्ये महाराष्ट्राने १२ गुण तर हरियाणाने १५ गुण मिळवले.दुसऱ्या हाफ मध्ये महाराष्ट्र संघाने ११ गुण तर हरियाणा संघ १५ गुण मिळवत सामना ०७ गुणांनी जिंकून अजिंक्य राहिला. या स्पर्धेत देशभरातील ३३ संघानी सहभाग घेतला होता.

या समारोप कार्यक्रमासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था,प्रवरानगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे,कर्नल संदीप खुराना यांची विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे,विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदीपकुमार भंडारी, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे,शालेय व क्रीडा व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,क्रीडा कार्यालयाचे सर्व अधिकारी,सर्व पंच, सर्व संघांचे व्यवस्थापक व प्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलताना सुष्मिता विखे म्हणाल्या की,”त्वरित निर्णय क्षमता,प्रेरणा व सांघिककार्य हे आज अंतिम सामन्या दरम्यान बघायला मिळाले.खेळामुळे हे गुण विकसित होतात,म्हणूनच खेळाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्याचबरोबर स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे अभिनंदन केले.

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई पटू हे पारितोषिक हरियाणा संघाची मनिषा सुखविंदर सिंग हिने पटकावले आहे,तर उत्कृष्ट बचाव पटू हे पारितोषिक राजस्थान संघाची आयना चौधरी हिने पटकावले.महाराष्ट्र संघाची आरती खांडेकर हिने सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून मान मिळवत पारितोषिकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी अत्यंत शिस्तबद्ध कौशल्यपूर्ण व चुरशीचा खेळ सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व आत्मा मालिक शैक्षणिक संकुल यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


