कोपरगाव तालुका
..रेशन दुकानांची तहसीलदारांनी केली पहाणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर निर्माण झाला असून आर्थिक दुर्बल घटकांची टाळेबंदीमुळे त्रेधातिरपट उडाली असताना सरकारने त्यांना धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.या लाभार्थ्यांना हा शिधापाणी रास्त भाव दुकानदारांकडून मिळतो की नाही याची पाहणी करण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी नूकताच तालुक्यात पाहणी दौरा केला आहे.व त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
कोपरगांव शहरात २४ व ग्रामीण भागात ९८ असे एकुण ११३ स्वस्त धान्य दुकानदार असुन त्यांचेमार्फत रेशनकार्ड धारकांना रेशनचे वाटप सुरु करण्यात आले आहे. माहे एप्रिल, मे, जुन या महिन्यासाठी स्वस्त धान्य दुकानातुन अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिकाधारकास प्रति शिधापत्रिका गहू २६ किलो दोन रुपये प्रति किलो दराने, तांदूळ ९ किलो तीन रुपये प्रति किलो दराने, साखर १ किलो वीस रुपये प्रति किलो दराने, चना डाळ १ किलो पंचवीस रुपये प्रति किलो दराने व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत तांदूळ पाच किलो प्रति व्यक्ती मोफत देण्यात येत आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांस गहू प्रति व्यक्ती तीन किलो दोन रुपये प्रति किलो दराने, तांदूळ प्रति व्यक्ती दोन किलो, तीन रुपये प्रति किलो दराने, तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत फक्त तांदूळ पाच किलो प्रति व्यक्ती मोफत मिळणार आहे. ए.पी.एल. केसरी शिधा पत्रिकाधारकांना गहू तीन किलो प्रति व्यक्ती आठ रुपये प्रति किलो दराने, तांदूळ दोन किलो प्रति व्यक्ती बारा रुपये प्रति किलो दराने वितरित करण्यात येत आहे. कोरोणाच्या संकटात कोणीही उपाशी राहणार नाही यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे पुरवठा विभागाने कळवले आहे.
नगरचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री जाधव, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे, निवासी नायब तहसिलदार योगेश कोतवाल,महसुल नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी, पुरवठा निरिक्षक सचिन बिन्नोड, गोदाम व्यवस्थापक बाळासाहेब बोगिर, तुरुंग अधिकारी रविंद्र देशमुख यांचे तहसिल कार्यालय पथकाने प्रत्यक्ष दुकानांना भेट देवून वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळत असल्याची खात्री लाभार्थीकडुन केली जात आहे. रेशन वितरणात अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर तालुका हा प्रथम स्थानावर असून, कोपरगांव तालुका दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती उपलब्ध झालीआहे. त्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.