साहित्य व संस्कृती
अभिरुचीसंपन्न दिवाळी अंकाची मेजवानीचा आनंद घ्या-जगताप
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
दिवाळीचा आनंद फराळ फटाक्यांसोबत दिवाळी अंक वाचनामुळे द्विगुणित होतो.लाडू,चकली,चिवडा यांचा आस्वाद घेत दिवाळी अंकाच्या वाचनातून ‘अक्षर’ फराळाची मेजवानी मिळते.कोपरगावकरांना यंदाच्या वर्षीही दिवाळी अंक वाचनाची पर्वणी साधता येणार असून त्यांनी दिवाळी अंक वाचनाच्या मेजवानीचा आनंद लुटावा असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नुकतेच केले आहे.
एके काळी वाचकांनाही झिंग यावी अशा अंकांची निर्मिती होत असे.अनेक लेखक आपले उत्कृष्ट लेखन दिवाळी अंकासाठी राखून ठेवायचे.दिवाळी अंकांनी वाचकांना वाङ्मयीन दृष्टी दिली.वाचक अभिरुचीवर संस्कार करणे आणि लेखकांना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करणे अशी दुहेरी जबाबदारी दिवाळी अंकांनी समर्थपणे पेलली आहे.त्यामुळेच दिवाळीचा सण केवळ चार दिवसांपुरताच मर्यादित न राहता कालविस्तार करून तो चार महिन्यांचा झाला.लेखक नसलेल्या विविध क्षेत्रांतील लोकांना लिहिते करण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे त्यांचे महत्त्व आजही कमी झालेले नाही.त्यामुळे प्रत्येक दिवाळी ला वाचक दिवाळी अंकाची वाट पाहत असतात.कोपरगाव शहरातील वाचकही त्याला अपवाद नाही.कोपरगाव नगरपरिषदेने दिवाळी अंकासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी मेजवानीच.कला,क्रीडा,राजकारण,अर्थकारण,विनोद,साहित्य,कथा,कांदबरी,कविता,सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य,आहार,व्यंगचित्र अशा वेगवेगळ्या विषयांवरील दिवाळी अंक वाचणे म्हणजे पर्वणी असते.
मौज,साप्ताहिक सकाळ,लोकसत्ता,लोकमत,पुढारी,महाराष्ट्र टाइम्स,हंस,जत्रा,आवाज,मोहिनी,धनंजय,माहेर,मेनका यांच्यासह मराठीतील नामांकित विविध प्रकाशन संस्थांचे दिवाळी अंक वाचनालयात आहेत.