शैक्षणिक
नैसर्गिक समतोल साधण्यासाठी पक्षी आवश्यक-डॉ.कुऱ्हाडे
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल ह्या समस्यांच्या निराकरणासाठी आपण पक्ष्यांचे अस्तित्व आणि त्यासाठी त्यांचे अधिवास टिकवून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला हवेत.तसेच ते पक्षी ज्या ज्या अन्न साखळ्याचे घटक आहेत त्या निसर्गातल्या सर्व प्रकारच्या अन्नसाखळ्या अबाधित राहतील याची आपण जीवापाड काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अ.नगर येथील न्यू आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.सुधाकर कुऱ्हाडे यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या महाविद्यालयात नुकतेच अ.नगर येथील न्यू आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.सुधाकर कुऱ्हाडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र तलवारे,विज्ञान मंडळाचे सदस्य डॉ.आर.डी.गवळी डॉ.बी.एस.गायकवाड,प्रा.मिलिता वंजारेसह विद्यार्थी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बी.एस.गायकवाड यांनी केले आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी विज्ञान मंडळाची भूमिका आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला.तसेच पक्षांच्या माध्यमातून होणारा बीज प्रसार याबद्दल महत्त्व विशद केले आहे.
सदर व्याख्यानामध्ये पुढे बोलताना प्रा.डॉ.कुऱ्हाडे यांनी ‘पक्षी विविधता व त्यांचे पर्यावरणातील महत्व’ या विषयावर आपले व्याख्यान दिले.यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भेट देऊन काढलेल्या छायाचित्रासह विद्यार्थ्यांना पक्षांची माहिती दिली.यामध्ये पक्ष्यांच्या अंडी घालण्याच्या वेळा,पक्ष्यांचे स्थलांतर यावरती प्रकाश टाकला.तसेच पर्यावरणामध्ये पक्षांचे महत्त्व यावरही त्यांनी आपल्या व्याख्यानातून भर दिला आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी डॉ.कुऱ्हाडे करत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.तसेच पर्यावरणामध्ये मधमाशा आणि पक्षी हे मानवासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी विशद केले.तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा व अशा पद्धतीचा एखादा तरी छंद जोपासावा की जेणेकरून पर्यावरणाच्या संरक्षणामध्ये आणि संवर्धनामध्ये आपला हातभार लागेल.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मिलीता वंजारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.आर.डी.गवळी यांनी मानले आहे.