आरोग्य
रुग्ण कल्याण निधी बंद,रुग्ण वाऱ्यावर ?
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
आरोग्य संस्थांना येत असलेल्या अडचणी दूर करणे व समित्यांमार्फत् रुग्ण सेवा जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण देणे ह्या दृष्टीने जिल्हा रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालये,ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी “रुग्ण कल्याण समिती” स्थापन करण्याचे शासन निर्देश होते मात्र आता या निधीवर शासनाची वक्र दृष्टी असून हा निधी बंद झाला असल्याने आरोग्य सेवेचे बारा वाजणार असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे हा निधी पूर्ववत सुरू ठेवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरोग्य संस्थांना येत असलेल्या अडचणी दूर करणे व समित्यांमार्फत् रुग्ण सेवा जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण देणे ह्या दृष्टीने जिल्हा रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालये,ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी धर्मदाय आयुक्तांच्या देखरेखीखाली “रुग्ण कल्याण समिती” स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिनांक ३० डिसेंबर २००५ व ४ मे २००६ च्या शासन परिपत्रकांन्नवये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या.त्यानुसार राज्यभर संदर्भसेवा रुग्णालये,सामान्य रुग्णालये,क्षयरोग रुग्णालये,कुष्ठरोग रुग्णालये,मनोरुग्णालये,जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी या समित्या स्थापन केल्या होत्या.त्यांना किमान पावणे दोन लाखांचा निधी वर्षाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत होता.शिवाय त्यांना प्रत्येक केस पेपरवर किमान पाच रुपये घेण्याची मुभा देण्यात आली होती.त्यातून प्रतिवर्षी त्या निधीवर व्याज मिळत होते त्यातून प्राथमिक आरोग्य केंद्रे आपला प्रपंच हाकत होते.परिणामस्वरूप ही रुग्णालये परिसर स्वच्छता,रुग्णालय परिसरात साफसफाई,स्वच्छता गृहे यांची स्वच्छता करीत होती.परिणामी ही आरोग्य केंद्रे लोकप्रिय ठरत होती.मात्र यातील केस पेपरची रक्कम सरकारने गत वर्षी १५ ऑगस्ट २०२३ रोजी बंद केली आहे.आता समितीच्या रुग्ण कल्याण निधी बंद करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्यातील सदरचा दहा पंधरा लाखांचा निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.राज्यातील अन्यत्र हीच स्थिती असल्याची माहिती आहे.त्यामुळे आगामी काळात हा निधी बंद झाला तर या आरोग्य केंद्रांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.शिवाय परिसर स्वच्छता,स्वच्छता गृहे यांचा खर्च कोण उचलणार हा प्रश्न गंभीर होणार आहे.त्यामुळे सदर रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे वेड्या बाभळीत हरवली तर नवल नको आणि स्वच्छता गृहांजवळ आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नाक झाकण्याची नामुष्की न ओढवली तर नवल ! त्यामुळे हा निधी पूर्ववत सुरू ठेवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या संबंधी आमच्या प्रतिनिधीने माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्याबाबत दुजोरा देताना सांगितले की,”सदरचा रुग्ण कल्याण निधी कोरोना पासून सरकारने बंद केल्याने अनुपलब्ध औषधे,आरोग्य सेवा देण्यात मर्यादा येत आहे.पूर्वी जिल्हा परिषद पदाधिकारी असल्याने ही रुग्णसेवा सुरळीत सुरू होती,मात्र आता प्रशासक राज असल्याने आरोग्य सेवा विस्कळित झाली आहे.आपण त्या वेळी नवजात मुलींच्या जन्माचे स्वागत करताना त्यांना या निधीमधून नवीन गणवेश देत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.