सहकार
…या सहकारी बँकेचे थकबाकीदार संचालक झाले अपात्र-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)-
प्रवरा सहकारी बँकेत बिनविरोध निवडून आलेले संचालक केशव पंढरीनाथ जवरे हे सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे यांनी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे विधीज्ञ अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडे करताच संचालक केशव जवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती शिवाजी जवरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.सदर बँक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची असल्याचे मानले जाते.

दरम्यान थकबाकीदार संचालक केशव जवरे यांनी सादर राजीनामा प्रवरा बँकेच्या संचालक मंडळाने मंजूर करून सदर संचालक बँकेच्या पदावर नसल्याबाबतचा अहवाल सहकार आयुक्त यांना सादर केल्यानंतर शिवाजी जवरे यांचा तक्रारी अर्ज निकाली काढण्यात आला असल्याची माहिती शिवाजी जवरे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असं की,”प्रवरा बँकेचे संचालक केशव जवरे हे ममदापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे दि.३१ मार्च २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत व आजतागायत थकबाकीदार असल्याने शिवाजी जवरे यांनी दि.१७ जुलै रोजी सहकार आयुक्त यांच्याकडे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ (क) (अ) प्रमाणे संचालक पद रद्द करण्यासाठी तक्रार अर्ज केला होता.तसेच बँकेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली होती.दरम्यान निवडणूक पुर्वी केशव जवरे हे ममदापूर सोसायटीचे थकबाकीदार होते.निवडणूक प्रक्रीया संपल्यानंतरही केशव जवरे सातत्याने थकबाकीदार होते.कर्ज थकबाकी असल्याने याबाबत सर्व पुरावे सहकार आयुक्त यांच्याकडे सादर करून केशव जवरे यांनी निवडणूक लढवताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा भारतीय दंड संहिता कलम-१९९,२०० व ४२० प्रमाणे दाखल करावा अशी मागणी शेतकरी संघतेनेचे कार्यकर्ते शिवाजी जवरे यांनी तक्रार अर्जात केली होती.

दरम्यान या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सहकार आयुक्त यांनी केशव जवरे यांचे कर्ज खात्याचा चौकशी अहवाल प्राप्त करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना आदेश दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या चौकशी अहवालात केशव जवरे हे निवडणुकीपूर्वी थकबाकीदार होते व निवडणुकीनंतरही थकबाकीदार असल्याचे नमूद केले होते.चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना प्राप्त होतात दि.२२ सप्टेंबर रोजी केशव जवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान सदर राजीनामा प्रवरा बँकेच्या संचालक मंडळाने मंजूर करून सदर संचालक बँकेच्या पदावर नसल्याबाबतचा अहवाल सहकार आयुक्त यांना सादर केल्यानंतर शिवाजी जवरे यांचा तक्रारी अर्ज निकाली काढण्यात आला असल्याची माहिती जवरे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.त्यामुळे हि विखे गटास मोठी चपराक मानली जात आहे.