नगर जिल्हा
…या नेत्याचे धोरण दूरदर्शी-माहिती
न्यूजसेवा
संवत्सर ( वार्ताहर )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणांमुळे कोरोना महामारीच्या काळात देशभरात मोफत लसीकरण आणि मोफत धान्य वितरण या दोन योजना सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आधारभूत ठरल्या असून यापुढे ग्रामीण भागातील जनतेला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार आरोग्याच्या सेवा मिळण्यासाठी आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर शासन अधिक भर देणार असल्याचे सूतोवाच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कोपरगाव तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे भूमीपूजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संवत्सर-कान्हेगांव-वारी या रस्त्याच्या दर्जोन्नतीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,भाजपाचे नेते रवींद्र बोरावके,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.गोरक्षनाथ बर्डे,महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”राज्यातील बारा कोटी लोकांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून मोफत आरोग्य सुविधा देण्याचा कल्याणकारी निर्णय सरकारने घेतला आहे.संवत्सरसारख्या ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालयाची सुविधा निर्माण होत असल्याने तालुक्यातील जनतेला याचा चांगला लाभ मिळणार आहे असे सांगून,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगात भारताची नवीन प्रतिमा तयार होत आहे.सबका साथ,सबका विकास,सबका प्रयास हा मंत्र बलशाली भारताच्या विकासाचे सूत्र बनले आहे.समाजातील प्रत्येक घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन सामांन्यांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील सर्वसामान्य व्यक्तींसह शेतकरी सुखी व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाला शासनाचे प्राधान्य आहे. केवळ एक रुपयांमध्ये पीकविमा उपलब्ध करून देणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.कोपरगाव तालुक्यातील ५२ हजार शेतकऱ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळाला असून सुमारे २५ कोटी अग्रीम रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.पारंपरिक शेत पिकांच्या उत्पादनाबरोबरच शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करतानाच शेतीला उपयुक्त असलेले शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे यांनी केले.शेतकऱ्यांना दिवसा वीज देता यावी म्हणून मुख्यमंत्री सौर उर्जा कृषी योजनेची सुरुवात राज्य सरकारने केली असून शेतकऱ्यांना यासाठी जमीन भाडेतत्वावर देण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.तालुक्यातील रोहित्राचा प्रश्न सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री विखे यांनी दिली आहे.
शेतीमहामंडळाची असलेली जमीन औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.या वसाहतीमध्ये येणाऱ्या उद्योग व्यवसायामुळे राहाता,कोपरगांवसह आसपासच्या तालुक्यातील युवक युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून बेरोजगार युवकांच्या हाताला त्यांच्याच भागात काम मिळणार आहे.अनेक वर्षे या जिल्ह्यात महसूलमंत्री पद होते तरी खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही अशी कोपरखिळी त्यांनी माजी मंत्री थोरात यांचे नाव न घेता त्यांनी लगावली आहे.
यावेळी आ.आशुतोष काळे बोलताना म्हणाले की,”पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी खंडाकऱ्यांच्या जमिनी २ मधून १ मध्ये आणून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.सावळीविहीर परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार या भागातील बेरोजगार तरुणांना आधार देणारा आहे.पाण्याच्या बाबतीत कोपरगांव व राहाता तालुक्यावर अन्याय झालेला असून मंत्री विखे यांनी रब्बी हंगामासाठी आवर्तने मिळण्यासाठीही लक्ष घालावे अशी मागणी शेवटी आ.काळे यांनी केली आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले आहे.सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार उपसरपंच विवेक परजणे यांनी मानले आहे.
सदर प्रसंगी कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर,पशुसंवर्धन विभागाच्या योजनेअंतर्गत गाय गटाच्या धनादेशाचे तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप तसेच गोदावरी खोरे दूध संघाने उभारलेल्या सोलर प्लॅन्ट व कोपरगांव येथे स्टेशन रस्त्यावर उभारलेल्या,’नामदेवराव परजणे’ शॉपिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन मंत्री विखे यांनी केले.तसेच तालुक्यातील माहेगांव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसह सुरेगांव येथील व अ.नगर जिल्हयातील आठ वाळू डेपोचे ऑनलाईन उद्घाटन मंत्री विखे यांच्याहस्ते करण्यात आले.