आंदोलन
… या पुतळ्याचे अखेर होणार लोकार्पण !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण मंत्री महोदयांच्या उपस्थित व्हावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंत्री,सामाजिक न्याय मंत्री आदी मंत्री महोदयांकडे आ.आशुतोष काळे यांनी पत्राद्वारे वेळ मागितली असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने नुकतीच दिली आहे.
कोपरगाव शहरातील सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव व त्यांच्या सहकाऱ्यांचे कोपरगाव शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ,’आमरण उपोषण आंदोलन’ सुरु केले होते.त्यावेळी त्या उपोषणकर्त्यांची आ.आशुतोष काळे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या त्या वेळी त्यांनी या बाबत आंदोलनकर्त्यांना आश्वासित केले होते.त्या पार्श्वभूमीवर हे प्रसिद्धी पत्रक हाती आले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,”कोपरगाव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी मागील वर्षी दि.६ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व विविध विकास कामांच्या लोकार्पण व शुभारंभासाठी कोपरगाव येथे आले असता त्यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्याचे ठरले होते.परंतु दुर्दैवाने हे अनावरण त्यावेळी होवू शकले नाही.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण व्हावे अशी मातंग समाजासह आपली देखील इच्छा आहे.त्याबाबत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला देखील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेने देखील सर्व नियोजन करून मंत्री महोदयांच्या हस्ते शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी माझ्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.त्यामुळे माझ्या मतदार संघातील असंख्य मातंग समाज बांधवांच्या व माझ्या भावनांचा विचार करावा.येत्या काही दिवसात आपण नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी कोपरगाव दौऱ्याचे देखील नियोजन करून कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करावे अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांना दिलेल्या पत्रात केली असल्याचे आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे.