सहकार
कोपरगावात अल्पबचत गटांना कर्ज वितरण संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ संचलित बचत गटांना मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या हस्ते नुकतेच धनादेश वितरण करण्यात आले आहे.
महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक उभारणी होत आहे. चांगले काम करणा-या महिला बचत गटाला बँकेकडून दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्जदेखील देण्यात येत आहे. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती शक्य आहे-पुष्पाताई काळे
बचत गटाच्या महिलांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांनी उभारलेल्या उद्योग-व्यवसायांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध बँकांचे अर्थसहाय्य मिळवून दिले जात आहे.काही महिन्यांपूर्वीच जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्याने सहा लाख रुपयांचे धनादेश बचत गटाच्या महिलांना देण्यात आले असून प्रियदर्शनी महिला मंडळ संचलित शिवपार्वती महिला बचत गट टाकळी,शिवकन्या महिला बचत गट गजानननगर व राजेश्वरी महिला बचत गट गांधीनगर यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे प्रत्येकी १ लाख असे एकूण ३ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.
बचत गटाच्या महिलांनी मिळालेल्या कर्जातून आपल्या उद्योग व्यवसायाची भरभराट करावी.ज्या महिलांच्या हातांना काम नाही त्या महिलांना आपल्या उद्योग व्यवसायात समावून घेवून त्यांच्या हातांना रोजगार मिळवून द्यावा.कर्जाचे हफ्ते नियमितपणे भरून आपली आर्थिक पत निर्माण करावी.यापुढील काळात बचत गटाच्या महिलांना यापेक्षाही जास्त पतपुरवठा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही पुष्पाताई काळे यांनी यावेळी दिली.या प्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ए.डी.खिल्लारे,दीपक मुंडे तसेच सर्व महिला बचत गटांच्या अध्यक्षा,सचिव व सदस्य महिला उपस्थित होत्या.