सहकार
…या विद्यालयात विद्यार्थ्यांना सहकाराचे धडे

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने समता इंटरनॅशनल स्कूल येथे आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकार सप्ताहाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सहकाराची ओळख आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

“सहकार म्हणजे पारंपरिक सावकारकीवर मर्यादा घालणारी आणि सामान्यांना आर्थिक साहाय्य करणारी चळवळ आहे”-संदीप रुद्राक्ष,सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,कोपरगाव.
संयुक्त राष्ट्र संघाच्या १९ जून २०२४ च्या आमसभेत २०२५ हे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने (इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स) दिल्ली येथे २५ ते ३० नोव्हेंबर २०२४ या काळात आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत तशी रीतसर घोषणा केली व त्याचे बोधचिन्ह प्रकाशित करण्यात आले.आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे.प्रथम २०१२ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून साजरे केले गेले.आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने या वर्षासाठी ‘सहकाराच्या माध्यमातून उत्तम विश्वाची बांधणी’ हे ब्रीदवाक्य निश्चित केले आहे.याचा आधार घेत विद्यार्थ्यांमध्ये सहकार रुजावा या साठी कोपरगावनजीक असलेल्या कोकमठाण हद्दीतील समता इंटरनॅशनल स्कूल येथे हा सहकार वर्षे आणि सहकार सप्ताह संपन्न झाला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे होते.
यावेळी आहिल्यानगर जिल्हा स्थैर्यनिधी संघाचे संचालक आशुतोष पटवर्धन,सहकारी संस्था,कोपरगाव सहकार कार्यालयाचे राजेंद्र रहाणे,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली अधिकारी गिरीश ताम्हाणे,अनिल पाटील अक्षर सोल्युशनचे अद्वैत माडगुळकर कोपरगाव तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे गोपीनाथ निळकंठ, अशोक कोठारी,हाशिम पटेल आदीसह पतसंस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक संदीप रुद्राक्षे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सहकाराची व्याप्ती,त्याचे फायदे आणि ग्रामीण भागातील सहकाराच्या महत्त्वाबद्दल माहिती दिली आहे.त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सहकार म्हणजे पारंपरिक सावकारकीवर मर्यादा घालणारी आणि सामान्यांना आर्थिक साहाय्य करणारी चळवळ असल्याचे सांगितले आहे.
यावेळी कोपरगाव तालुक्यातील ९० सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींना नियामक मंडळ परिपत्रक व कर्ज नियमावली याविषयी प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रमात पतसंस्थांच्या कारभारातील पारदर्शकता आणि शिस्त याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी समता सहकार वाटिकेचे उद्घाटन समता इंटरनॅशनल स्कूल येथे संदीप रुद्राक्षे यांच्या हस्ते पार पडले.त्याचप्रमाणे,समता पतसंस्थेच्या ‘बाल गौरव ठेव योजना’ अंतर्गत सर्वाधिक बचत ठेव करणाऱ्या समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी यशवंत चव्हाण,निखिल काले,प्रीती चव्हाण,आराध्या बोरणारे,आदी खाबिया,राजविका घुमरे,अभिराज पाडोळ,ऋषिकेश कोळपे,अर्णव आढाव आदींचा सत्कार करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य समीर आत्तार यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुका फेडरेशनचे संचालक केशवराव भवर यांनी मानले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश निळकंठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.