सहकार
…या सहकारी संस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सेवकांची पतपेढी या संस्थेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेच्या कर्मवीर शंकरराव काळे सभागृहात पार पडली आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आभाळे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,”माजी आ. अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतीपथावर आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या कामगार सभासदांना वैयक्तिक कर्ज पुरवठा,आवश्यक सोयी सुविधा पुरवित आहे.संस्थेने ५ कोटी ६४ लाख ९३ हजार कर्ज वाटप केले असून त्या माध्यमातून व इतर उत्पन्नातून संस्थेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण २२ लाख २७ हजार रुपयांचा नफा झाला असून संस्थेला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.
संस्थेच्या भाग भांडवलात सातत्याने वाढ होत आहे.त्यामुळे संस्थेला बँक कर्जाची कमीत कमी आवश्यकता भासणार असून संस्था लवकरच स्वभांडवली होईल अशी अपेक्षा व्यक्त करून यावर्षी सभासदांना ८ % लाभांश देणार असल्याचे सांगितले.यावेळी सभेपुढे मांडण्यात आलेले १ ते १२ विषय सभासदांनी टाळ्याच्या गजरात मंजूर केले.यावेळी जास्त ठेव ठेवणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी अध्यक्षपदाची सुचना नितीन साबळे यांनी मांडली.या सूचनेस बबन वाकचौरे यांनी अनुमोदन दिले. श्रद्धांजली ठरावाचे वाचन संचालक नितीन गिरमे यांनी केले आहे.
अहवाल वाचन व्यवस्थापक कुलदीप गांगुर्डे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष वैभव काळे,संचालक संदीप आढाव यांनी केले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,कारखान्याचे सचिव बाबा सय्यद,अर्थ व्यवस्थापक सोमनाथ बोरनारे,माजी अध्यक्ष अविनाश कोल्हे,बाळासाहेब आभाळे,कामगार सभा सहसचिव नितीन गुरसळ आदी मान्यवरांसह संस्थेचे सर्व सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.