सण-उत्सव
कोपरगावात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील तहसील प्रांगणात संपन्न झालेल्या महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहन तहसीलदार विजय बोरुडे यांच्या हस्ते संपन्न झाले तर कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रांगणात संपन्न झालेल्या महाराष्ट्र दिनाचे निमित्त ध्वजारोहन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
कोपरगाव तहसील प्रांगणात तहसीलदार विजय बोरुडे यांनी ध्वजारोहण केले त्याचे छायाचित्र.
दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेसमोर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे अनावरण करावे,खुले नाट्यगृहाचे कामास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी या मागण्यासाठी ऍड.नितीन पोळ यांनी धरणे आंदोलन केले आहे.त्यांना मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सदर ठेकेदारावर कारवाई झाली असून लोकशाहीर साठे पुतळ्याचे अनावरण लवकरच केले जाईल असे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित केले आहे.
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे.या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते.हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात,विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.कोपरगाव शहरात कोपरगाव नगरपरिषदेत हा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,वैभव गिरमे,नितीन पोळ,भाऊसाहेब शिंदे,उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,आरोग्य निरीक्षक आदी प्रमुख मान्यवरांसह सर्व विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान या दोन्ही ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमात आ.आशुतोष काळे,माजी आ.कोल्हे व त्यांचे आजी-माजी पदाधिकारी नगरसेवक,कार्यकर्त्यांनी या महाराष्ट्र दिनाकडे पाठ फिरवणे पसंत केले आहे.याबाबत शहरातील नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली असून या घटनेचा निषेध केला आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत आम्हाला निमंत्रणच दिले नव्हते असा धक्कादायक खुलासा केला असून आतापर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले असल्याचा आरोप केला आहे.व तहसील प्रशासनावर व त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान कोपरगाव पंचायत समितीचे ध्वजारोहण प्रशासक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते तर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या तर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.तालुक्यातील विविध शिक्षण संस्था,महाविद्यालये,स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.