विशेष दिन
नीतिमत्ता हरवलेले नेते पत्रकारांकडून अपेक्षा कशा करतात-…यांचा सवाल

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
वर्तमानात राजकारण आणि समाजकारणाची पूर्वीची नैतिक विचारधारा हरवली असून आहे.यात सहभागी असलेली राजकीय मंडळी आता पत्रकाराकडून अशी अपेक्षा कशी करू शकतात ? असा सवाल झी २४ तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

“पूर्वी पत्रकारांवर जेवढे गुन्हे जास्त तेवढा पत्रकार आणि त्याची लेखणी धारदार समजली जात होती.जेवढे पत्रकारांवर दावे जात असतील ते त्यांना मिळालेले पुरस्कार समजले जात असत.समाजात आज एवढी मुक्त परिस्थिती राहिली नाही.अभिव्यक्ती निर्देशांकात जगात भारताचा १८० देशात १५१ वा क्रमांक आहे.हे मोठे खेदजनक आहे”-कमलेश सुतार,झी २४ तास मुख्य संपादक.
पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्राच्या स्मृती निमित्त महाराष्ट्र राज्यात साजरा केला जात असून आज तो कोपरगाव शहरातील संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे होते.

सदर प्रसंगी झी चे सोशल मिडियाचे प्रशांत जाधव,संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अमित कोल्हे,सुमित कोल्हे,कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक अंबादास अंत्रे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना सुतार म्हणाले की,”पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे.पत्रकारितेत आता मोठे बदल झाले असून वर्तमानात पत्रकार जुने राहिले नाही.त्याचबरोबर नेते मंडळी सुद्धा तसे विचारी राहिले नाही याची प्रांजळ कबुली उपस्थितांनी दिली पाहिजे.जुन्या काळी पत्रकार पत्रकारिता करत होते,पण त्या व्यवस्थेचे भाग होत नव्हते.पत्रकारांवर तेंव्हा एवढे गुन्हे दाखल होत नव्हते.आज मात्र उलटी परिस्थिती आहे.पूर्वी पत्रकारांवर जेवढे गुन्हे जास्त तेवढा पत्रकार आणि त्याची लेखणी धारदार समजली जात होती.जेवढे पत्रकारांवर दावे जात असतील ते त्यांना मिळालेले पुरस्कार समजले जात असत.आज एवढी मुक्त परिस्थिती राहिली नाही.अभिव्यक्ती निर्देशांकात जगात भारताचा १८० देशात १५१ वा क्रमांक आहे.हे मोठे खेदजनक आहे.तर आपला दुश्मन देश पाकिस्तान भारताच्या फक्त काही अंकांनी मागे आहे.पाकिस्तानात पत्रकार भारतापेक्षा जास्त मुक्तपणे पत्रकारिता करू शकतात असा दावा त्यांनी केला आहे.मीही काही दिवसापूर्वी पाकिस्तानात पंधरा दिवस गेलो होतो.त्यावेळी हा अनुभव आला असल्याचा दावा केला आहे.वर्तमानात जगासह भारतीय राजकारणी मंडळींचा दर्जा इतका खालावला आहे की नगरपरिषद निवडणुकीत एक उमेदवाराने ए.बी.फॉर्म खाऊन टाकला असल्याचे सांगून टाकले आहे.आता यावर काय बोलणार.पूर्वी काँग्रेसचा वैचारिक दर्जा सुद्धा चांगला होता त्याची आठवण करून देत त्यांनी आज एखादा कार्यकर्ता एस.टी.ने जाताना दिसतो का ? असा सवाल केला आहे.मात्र तशी परिस्थिती काही दशकापूर्वी होती.कधीकाळी लोकलमधून फिरणारा कार्यकर्ता नगरसेवक झाल्यावर तो फॉर्चुनर गाडीमध्ये फिरतो.यावर वर्तमानात दिसत असलेले राजकीय चित्र स्पष्ट होत असल्याचे सांगून राजकारण हा आता उद्योग झाला असल्याचे स्मरण करून दिले आहे.माझे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील असून संजीवनी बद्दल यापूर्वी आपण बरेच ऐकले होते.त्यांचे शैक्षणिक काम चांगले असल्याचे आपल्याला कौतुक वाटत आले आहे.प्राचीन काळात शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र याच ठिकाणी संजीवनी पारावर दिला होता.या शिवाय कोपरगाव शहराला ऐतिहासिक वारसा असून ‘ध’ चा ‘मा’ करणारी पेशवाईतील राघोबा दादांची आनंदीबाई येथेच राहत होती.त्या अर्थाने संजीवनी शिक्षण संस्था ही नवजीवन देणारी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाळकडू देणारी संस्था म्हटली पाहिजे असे आपल्या वर्गमित्राची आठवण करत कौतुक करण्यास ते विसरले नाही.वर्तमानात पत्रकार हे अनेक पक्षात वाटले गेले असल्याचे सांगून पत्रकारिता आता नीचांकी पातळीवर जातीजातीत वाटला गेल्याचे आपल्याला आढळून आले असल्याचे सांगण्यास त्यानी संकोच केला नाही.वर्तमानपत्राची परिस्थिती भारतातच नाही तर जगभरात बदलत आहे.उजव्या विचारसरणीचा विस्तार मोठ्या होताना दिसत आहे.ही माध्यमांसाठी वाईट घटना आहे.पत्रकारांना देशविरोधी ठरविण्याचे काम जगभर सुरू आहे.वर्तमानात अनेक वृत्तवाहिन्या आता धर्मविध्वेष पसरविताना दिसत आहे.त्यावेळी व्यासपीठावरील राजकीय उपस्थितांकडे कटाक्ष टाकून त्यांनी राजकीय मंडळी व्यासपीठावर असताना बोलणे कठीण जाते असल्याचे सांगितले आहे.राज्यातील राजकीय आणि निवडणुकीत डोके फोडणारी मंडळी दुसऱ्या क्षणाला महाराष्ट्राची संस्कृतीचे गोडवे गाताना दिसते यावर हसावे की रडावे अशी स्थिती पत्रकारांवर ओढवत आहे.सोशल मीडियावर बोलताना आणि टोकाचे व्यक्त होताना कार्यकर्त्यांनी नक्कीच विचार करायला हवा आहे.वर्तमानात राजकीय पक्षांवर भाष्य करताना त्यांनी राष्ट्रवादीवर राजकीय आसूड ओढला आहे.त्यात त्यांनी राष्ट्रवादीवर तर बोलायलाच नको ही एकमेकावर तुटून पडणारी मंडळी एकाएकी कौतुक करायला लागली की यांच्यावर काय बोलावे असा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगितले आहे.आपण यापूर्वी देशात पत्रकारितेचे अनुभव घेतले असून राजकीय दृष्ट्या अस्थिर असलेल्या गोवा राज्याचे विदारक वास्तव स्पष्ट केले.यावेळी त्यांनी गुजरातचे राजकीय,सामाजिक अनुभव स्पष्ट केले आहे.यावेळी त्यांनी गोव्यातील वर्तमानातील राजकीय भाष्य करताना राजकीय नेते सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जाताना दिसत असल्याचे विषद केले आहे.वर्तमानात राजकारणाचा आता मोठा खेळखंडोबा झाला असल्याचे सांगितले आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात आताच्या राजकारणातील फरक जमीन अस्मानाचा झाला आहे.त्यावेळचे राजकारणी एका टोकाचे तर आजचे राजकारणी दुसऱ्या टोकाचे असल्याचे पहायला मिळतात.राजकारणाला लोक आता सवंग करमणूक म्हणून आता पाहू लागले आहे.पूर्वी आढळून येणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या वर्तमानपत्रांच्या पुरवण्या आता दिसू शकत नाही.वाचकाना आता द्यान आणि माहिती यात फरक आता समजत नाही.ज्येष्ठ नागरिक आता मोठ्या प्रमाणावर सामाजिक संकेतस्थळाचा आहारी गेले असल्याचे सांगितले आहे.त्यातून आता सायबर गुन्हे वाढले आहे.माहितीचा स्फोट झाला आहे काय घ्यायचे आणि काय नाही याचा लोकांना फरक कळेनासा झाला आहे.ए.आय.च्या माध्यमातून बातम्या होऊ लागल्या आहेत.त्यातून मतदारांचा एक्सिट पोल केला होता.आज तरी ए.आय.मर्यादित आहे.आणि पुढे मात्र काय होईल असे सांगता येत नाही.
राजकारणी मंडळीना जर पत्रकारांनी प्रश्न विचारला तर अनेकांना राग येतो हे थांबायला हवे.सर्वच पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी हे थांबवायला हवे असे आवाहन केले आहे.राजकीय पक्षांच्या नेत्यांना आता डेबिटवर येताना शिव्या देऊ नका असे आम्हाला सांगावे लागते.त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि त्यांची पत्नी वेणूताई चव्हाण यावर तत्कालिन विनोदी लेखक आणि पत्रकार प्र.के.अत्रे यांनी प्रखर टीका केली होती.मात्र चूक लक्षात आल्यावर त्यांनी व्यक्तिगत माफी मागितलीच पण जाहीर माफी मागण्यास संकोच केला नव्हता याची आठवण करून दिली आहे.यावेळी विधानसभेचेतील कामकाजाचा अनुभव सांगताना त्यावेळी महाराष्ट्र टाइम्सने सभागृहातील काढून टाकलेलं कामकाज संकेत धुडकावून आपल्या वर्तमान पत्रात छापले होते.जनतेला तुम्ही निवडून दिलेले नेते कसे एकमेकाला शिवराळ भाषेत उल्लेख करतात हे वाचकांच्या लक्षात आणून दिले असल्याची आठवण करून दिली आहे.त्यावर त्यांनी समाजाला आपले नेते कसे वागतात हे समजावे म्हणून छापले असल्याचा दावा केला होता.याची आठवण करून दिली आहे.वर्तमानात ‘यू ट्यूब’ ची विचारसरणी ही पक्षनिहाय झाली असल्याचा दावा करताना त्यांनी या मंडळींनी खरी पत्रकारिता केलेली नाही हे वास्तव सांगितले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा आणि त्याची खरेदी कशी झाली यावर चिंता व्यक्त केली आहे.व माध्यमांना याचे श्रेय दिले आहे.व्यवस्थेला पत्रकारांनी प्रश्न विचारलाच पाहिजे.(हे बोलताना येथे सर्व पत्रकार आहे ना याची खात्री करून घेतली आहे.) राजकारणी मंडळींना त्यांची चूक ही निर्भीडपणे दाखवलीच पाहिजे.अशी खरी पत्रकारिता ग्रामीण भागात अजून जिवंत राहिली असल्याचे सांगितले आहे.त्यांचेकडून आपल्याला अनेकवेळा चांगली माहिती मिळाली असल्याची आठवण करून दिली आहे.मला एका खाजगी चर्चेतून मला राष्ट्रीय पातळीवर विषय मिळाला होता हे आवर्जून सांगितले आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका आहे का असा प्रश्न उपस्थित राजकीय नेत्यांना विचारला त्यावेळी त्यांनी शिर्डी पूर्वी कोपरगाव तालुक्यातील होती मात्र नंतर ती राहाता तालुक्यात गेली.असे सांगताच कशी गेली यावर त्यांच्यासह उपस्थिताना हसू आवरले नाही.
दरम्यान भाषाभिमानावर बोलताना दक्षिण भारत आपल्या मातृभाषेवर खूप अभिमान करत असल्याचे सांगून आपणही तो नक्की बाळगला पाहिजे असे सांगून पूर्वी कधीकाळी दक्षिण भारतात अभियंता निर्माण होत होते.आता संजीवनीने तो वसा सुरू ठेवला असल्याचे कौतुक केले आहे.वर्तमान पत्रे म्हणजे दर्पण (म्हणजे आरसा) आहे हे उपस्थिताना सांगून त्याला फोडू नका तर आपल्या तोंडावरील काळा डाग आपण काढला पाहिजे असे सांगून आपल्या भाषणाचा समारोप केला आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक विश्वस्त अमित कोल्हे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.साहेबराव दवंगे यांनी केले तर आभार किरण ठाकरे यांनी मानले आहे.



