वन व पर्यावरण
वृक्ष संवर्धन काळाची गरज-माजी नगराध्यक्ष
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी भागातील अंजनापुर या गावाने गेल्या दहा वर्षापासून हजारो वृक्ष आजपर्यंत लावून वृक्ष संवर्धनाचे मोठे कार्य केले असल्याचे कौतुकोद्गार माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नुकतेच एका कार्यक्रमांत बोलताना केले आहे.
वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.ही गरज ओळखून कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील वृक्ष फौंडेशन या संस्थेने हा उपक्रम सुरू केला असून त्याची पहाणी त्यांनी नुकतीच केली आहे.त्यावेळी ते बोलत होते.
धरणीमातेने मुक्त हस्ते बहाल केलेला मौल्यवान खजिना म्हणजे वृक्ष आणि वेली. ‘परोपकाराय फलन्ति वृक्षाः’ या शब्दात वृक्षांचा गौरव केलेला आहे.निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार पुरातन कालापासून आहे.अगदी अनादी कालापासून निसर्ग मानवाचा मित्र आहे.वृक्ष ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.अलीकडे पर्यावरण प्रदूषणाविषयी बरेच काही वर्तमानपत्रातून वाचायला मिळते.प्रदूषणाचे दुष्परिणाम आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत.आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच पृथ्वीचा,मानवाने सुरू केलेल्या जंगलतोडीमुळे पृथ्वीचा समतोल बिघडत चाललेला आहे.
त्यावेळी पुढे बोलतांना त्यांनी म्हटले आहे की,”निसर्ग आपल्याला भरभरून देतो.माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे.तो सन्मार्ग दाखवतो.पण लक्षात कोण घेतं.आज हाच माणूस आपल्या उपकारकर्त्यावर उलटला आहे. माणसाने निसर्गाला विद्रूप करायचा जणू चंगच बांधला आहे.एकेकाळी वैभवशाली असलेल्या निसर्गाला अवकळा येत चालली आहे.मानवी मन हे निसर्गदत्त आहे.आजच्या या यंत्रयुगीन युगात तो यंत्रांच्या जंजाळात जेवढा अधिक अडकतो तेवढेच त्याचे मन निसर्गाकडे खेचले जाते.म्हणून तर डेरेदार वृक्षाच्या सान्निध्यात त्याचे मन सुखावते.निसर्गाच्या ओढीने मन त्याचे आसुसते.ही नैसर्गिक गरज ओळखून अंजनापूर येथील कार्यकर्त्यांनी आपले काम सुरू केले आहे.ही मोठी समाधानाची बाब आहे.या वृक्षप्रेमी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे गणपती उत्सवाच्या काळात चाकरमाने कोकणातले लोक हे मुंबईहून आपापल्या गावी जाऊन हा उत्सव दरवर्षी अविरतपणे करतात.त्याच पद्धतीने या गावातून बाहेरगावी गेलेले तरुण वर्ग,माणसं,महिला भगिनी हे दरवर्षी जुलै महिन्यात ६,७,८,९ या तारखेला आपल्या गावात येऊन वृक्षारोपणाचे कार्य करतात व परत आपापल्या नोकरीच्या ठिकाणी जातात व गावात राहणारी मुले नागरिक ही झाड जोपासण्याचे अविरत काम चालू ठेवत आहेत.गेल्या दहा वर्षा वर्षात यांनी १४ हजार झाडे लावून ती मोठे केली आहेत.अशा ह्या आदर्शवत अंजनापुर गावाला सर्वांनी भेट द्यावी व हे कार्य वृक्षारोपणाचे वाढवावं.त्यातून कोपरगाव तालुका तालुका हिरवागार होऊन पावसाचे प्रमाणही वाढेल व उन्हाळ्याची तीव्रता जाणवणार नाही व पूर्वीप्रमाणे कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाऊन आगामी काळात हे गाव जगाच्या नकाशावर नक्कीच येईल असा आशावाद मंगेश पाटील यांनी शेवटी व्यक्त केला आहे.