महावितरण विभाग
सिन्नर तालुक्यातील १३२ के.व्ही.वीज उपकेंद्र कार्यान्वित,लाभ कोपरगावकरांना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील वीज वितरण कंपनीचा वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १३२ के.व्ही. उपकेंद्र उभारण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून शहा येथील कार्यान्वित झालेल्या १३२ के.व्ही.ए. या वीज उपकेंद्रामुळे पोहेगाव,सुरेगाव,चासनळी उपकेंद्रांचा भार होणार हलका होणार असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्याना कमी दाबाने विज पुरवठा होत होता.त्यामुळे खरीप आणि रब्बी पिकांना त्याची मोठी किंमत चूकवावी लागत होती.त्यासाठी तत्कालीन आ.अशोक काळे यांनी अतिरिक्त व पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना वीज मिळावी म्हणून १३२ के.व्ही.ए. चे वीज उपकेंद्र कोपरगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागात सिन्नर तालुक्यातील शहा येथे मंजूर केले होते.ते आता सुरु झाल्याने पोहेगाव आणि चासनळी आदी विभागातील शेतकऱ्यांना वीज पूर्ण दाबाने मिळण्यास मदत मिळणार आहे.
माजी आ.काळे यांनी २००९ ते २०१४ या कार्यकाळात विरोधी पक्षाचे आमदार असतांना कोपरगाव तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आघाडी सरकारचे तात्कालीन ऊर्जा मंत्री ना.अजित पवार यांच्या सहकार्याने सुरेगाव येथे १३२ के.व्ही.ए.विज उपकेंद्र मंजूर केले होते.त्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची १० एकर जागा देखील देण्यात आली होती.२०१५ मध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी या १३२ के.व्ही.ए. विज उपकेंद्राचे भूमिपूजन देखील तत्कालीन ऊर्जामंत्री ना.पवार यांच्या हस्ते होणार होते.मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यावेळी हे भूमिपूजन रखडले होते.
मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन आघाडी सरकार जावून युतीचे सरकार आले.त्यामुळे या १३२ के.व्ही.ए.विज उपकेंद्राचा प्रश्न रेंगाळला होता.त्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून या १३२ के.व्ही.ए.विज उपकेंद्राला सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यास परवानगी देण्यात आली होती.या वीज उपकेंद्राचे काम पूर्ण होवून सर्व प्रकारचे तांत्रिक प्रात्यक्षिके देखील पूर्ण झाले असून हे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाले आहे.
या वीज उपकेंद्राला कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव,सुरेगाव,चासनळी उपकेंद्र जोडली जाणार आहेत.त्यामुळे त्याचा फायदा या उपकेंद्रा अंतर्गत असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील घरगुती व कृषी पंपांना पूर्ण क्षमतेने सुरळीत वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.त्याचबरोबर कोपरगाव उपकेंद्राचा भार कमी झाल्यामुळे कोपरगाव तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.त्यामुळे सिन्नर आणि कोपरगाव पश्चिम भागामधील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.