महसूल विभाग
प्रशासनाचा खर्च जनतेच्या खिशातून होतो याची जाणीव ठेवा-…या नेत्याचा इशारा

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
जनतेच्या कराच्या माध्यमातूनच प्रशासकीय यंत्रणेचा खर्च भागवला जात असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यानी जाणीव ठेवून जनतेची सेवा करण्याची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

दरम्यान महसूल सप्ताहात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.नागरिकांपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून महसूल विभागाच्या योजना पोहोचवणे व चांगले काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव करणे असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार महसूल विभागाच्या वतीने राज्यात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला असून त्यानिमित्ताने महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,भूमी अभिलेख विभागाचे रमाकांत डाहोरे,दुय्यम निबंधक पोपटराव कुसळकर,नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,चंद्रशेखर कुलथे,मनिषा कुलकर्णी आदींसह मंडलअधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ जास्तीत पात्र गरजू नागरीकांना मिळावा यासाठी माझे सातत्याने प्रयत्न असतात त्यासाठी कार्यकर्ते देखील त्यांच्या परीने समाजातील गरजू नागरीकांना मदत करीत असतात.परंतु आपला समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांचा संपर्क असतो.त्यामुळे कुणाची परिस्थिती कशी आहे व कुणाला जास्त गरज आहे याची आपणास चांगल्या प्रकारे जाणीव असते.त्यामुळे अशा पात्र व गरजू नागरिकांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.या सप्ताह दरम्यान महसूल विभागाकडून दिल्या जाणार्या सेवा आणि राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. त्यांना या योजनांचा योग्य लाभ घेता यावा यासाठी सविस्तर मार्गदर्शन करा.जास्तीत जास्त गरजू पात्र नागरीकांना शासनाच्या योजनांचा लाभ देता येईल यासाठी प्रयत्न करावा.नागरिकांमध्ये शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल अतूट विश्वास निर्माण करा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी शेवटी केले आहे.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.