नैसर्गिक आपत्ती
अंजनापूर बंधारा फुटल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील बंधारा गुरुवार (दि.०८) रोजी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे फुटला असून त्यामूळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तयार करा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी तालुका प्रशासनास दिल्या आहेत.
दरम्यान आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाने कोपरगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली असून अनेक ठिकाणी खरीप पिके पाण्याखाली गेल्याचे दूरध्वनी आमच्या प्रतिनिधींशी आले आहे यात संवत्सर येथील रमेश गायकवाड यांचे सह अनेकांचा समावेश असल्याची माहिती आहे.अद्याप सरकारी आकडेवारी येणे बाकी आहे.
मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे अंजनापूर येथील बंधाऱ्याला काही प्रमाणात धोका निर्माण होवून बंधारा फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे अंजनापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी तात्पुरती डागडुजी केली होती.मात्र गुरुवार दि.०८ सप्टेंबर रोजी पहाटे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळल्याने बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होवून क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्यामुळे हा बंधारा अखेर फुटला आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या लगत असणाऱ्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या असलेल्या सोयाबीन,मका,बाजरी आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर बंधारा फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेवून आ. काळे यांनी तातडीने तहसीलदार विजय बोरुडे व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल तयार करून शासन दरबारी सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना प्रशासनाला सदरचा बंधारा दुरुस्तीसाठी यंत्रणा पाठविण्याच्या सूचना दिल्या आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समिती अभियंता जी.डी.लाटे,पाटबंधारे विभागाचे ए.पी.वाघ,आर.आर.रोहम, शाखा अभियंता एन.जी.गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.