निवडणूक
निळवंडे कालवा समिती निवडणुकीत घेणार निर्णायक भूमिका !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक जोरात सुरू झाली असून यात महायुती आणि महाआघाडीचे नेते जनतेला मोठमोठी आश्वासने देत आहे.मात्र निळवंडेच्या कालव्यांच्या अर्धवट कामाबाबत ‘च’ कार शब्द काढत नसून याबाबत निळवंडे कालवा कृती समितीने आपली भूमिका जाहीर केली असून,”जे नेते या प्रश्र्नी खोटे श्रेय घेण्याचा खोटारडेपणा करणार नाही आणि उर्वरित निळवंडे प्रश्नाशी प्रामाणिक राहतील त्यांनाच समिती मदत करण्याची भूमिका समिती घेणार असल्याची माहिती कालवा कृती समितीचे सचिव कैलास गव्हाणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले असून राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.त्यासाठी राज्यात सर्वत्र निवडणूकमय चित्र निर्माण झाले आहे.आपापले घोडे दमटण्यासाठी सर्वच नेते आणि नेत्याचे कार्यकर्ते अंगावर झुली चढवून वाद्यांच्या गोगांटात ताल धरून लागले आहे.हौशे,नवशे,गवशे सर्वच कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे.मात्र एका पातळीवर सर्वत्र स्मशान शांतता दिसून येत आहे.निळवंडे प्रश्नांच्या अर्धवट कामाबाबत पिंडाला कावळा शिवत नाही तशी ही भामटी मंडळी त्यास शिवायला तयार नाही.एरव्ही श्रेयासाठी पुढे येणारी आणि स्वतःची छाती पिटणारी ही नेते मंडळी आता या प्रष्नी तोंडात गुळणी धरून बसली आहे.याबाबत गावोगावच्या कार्यकर्त्यांनी आणि दुष्काळी जनतेने यांच्या तोंडातील बोळा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
गत वेळी समितीच्या संघर्षाने अनेकांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली मात्र त्यांच्या तोंडाला काळे फासल्या प्रमाणे त्यांनी पाचही वर्ष आपले तोंड झाकून घेतले असल्याचे दिसून आले आहे.मात्र निळवंडे कालवा कृती समितीने पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा सुरू ठेवला आहे.आता या उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी येत्या १४ जुलै रोजी ५४ वर्ष उलटले असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.०५ हजार १७७ कोटींवर गेला आहे.अकोले तालुक्यातील कालव्यांची कामे समितीने पोलिस बंदोबस्तात सुरू केली होती.त्यानंतर सरकारने उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली मुदत ३१ मार्च व ऑक्टोबर २०२२ रोजी संपल्याने व आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही व उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय आता कोणतीही वाढीव आर्थिक तरतूद करता येणार नसल्याचा इशारा दि.१८ जानेवारी २०२३ रोजी अड.अजित काळे यांच्या मार्फत विक्रांत काले व नानासाहेब जवरे यांनी दाखल केलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत (क्र.१३३/२०१६) दिला होता.
त्यानंतर १३ जुलैला २०२४ आर्थिक अधिकार गोठवले होते.त्यानंतर कालव्यांचे काम जलसंपदा विभागाला मुदत वाढवून देऊन डावा कालवा मार्च २०२३ अखेर तर उजवा कालवा हा जून २०२३ अखेर पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरले होते.हा प्रकल्प पूर्ण व्हावा हि राजकीय नेत्यांची अद्यापही मानसिकता दिसत नाही.त्यांनी यासाठी विविध क्लुप्त्या लढविण्याचे व स्वतःचे नाक कापून अपशकुन करण्याची एकही संघी राहाता आणि संगमनेर,कोपरगाव,अकोले तालुक्यातील ही मंडळी सोडत नाही.त्यांनी प्रकल्प अर्धवट ठेवण्यासाठी नसते उद्योग अद्याप सुरूच ठेवले आहे.त्याचे ताजे उदाहरण हे गतवर्षी या भंडारदरा व निळवंडेतून प्रत्येकी १.५ टि.एम.सी.असे एकूण ०३ टि.एम.सी पाणी जायकवाडीत वर्ग करणे गरजेचे असताना पूर्ण साडेतीन टि.एम.सी.पाणी निळवंडेतून वर्ग करून दुष्काळी शेतकऱ्यांवर अन्याय केला असून यांचे ‘पुतना मावशी’चे प्रेम उघड झाले होते.उर्वरित पाणी त्यांनी जाणीवपूर्वक दि.२८ एप्रिल २०२४ रोजी प्रवरा नदीत सोडून देऊन आपली सत्तेची पोळी भाजून घेतली आहे.अद्याप वितरण व्यवस्था अपूर्ण आहे ही गोष्ट त्यांना नक्कीच भूषणावह नाही.अद्याप गतवर्षी चाचणीचे पाणी अनेक दुष्काळी गावांना मिळालेले नाही.त्यासाठी अकोले तालुक्यातील अस्तरीकरण जलद होणे गरजेचे असताना या पातळीवर संतापजनक मंदगती दिसत आहे.या शिवाय अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्याच्या साईड गटारी अद्याप पूर्ण झालेल्या नाही परिणामी प्रत्येक आवर्तनात काही शेतकरी व काही राजकीय संघटना आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आंदोलने करून सदर आवर्तनाचे पाणी बंद करण्याची मागणी करतात.शेतीचे नुकसान होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.मात्र अकोले तालुक्यातील कि.मी.०१ ते २८ दरम्यान कालव्यांच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या जलसंपदा विभागाने पूर्ण केलेल्या नाही.त्याबाबत आमच्या संघटनेने या प्रश्र्नी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला असता त्यांनी शेतकरी जलसंपदा विभागाने भुसंपादित केलेल्या जमिनीत शेती करत असल्याचे दिसून आले आहे व ते सदर साईड पट्ट्या करून देण्यास विरोध करत असल्याचे दिसून आले आहे.तर काही राजकीय संघटना आगामी निवडणुका पाहून कालव्याचे पाणी बंद करण्याची अनाठायी मागणी करत असून आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत.त्यामुळे दुष्काळी भागातील १८२ गावांवर अन्याय होण्याची भीती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर आज निळवंडे कालवा कृती समितीची प्रमुख कार्यकर्त्यांची आज शिर्डी येथे बैठक आयोजित केली होती.त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,बाबासाहेब गव्हाणे,संघटक नानासाहेब गाढवे,सह संघटक उत्तमराव जोंधळे,भाऊसाहेब गव्हाणे,साहेबराव गव्हाणे,विजय थोरात,दत्तात्रय थोरात,रमेश गव्हाणे,भिवराज शिंदे,दगडू रहाणे,वाल्मीक नेहे,चंद्रकांत थोरात,जगन्नाथ पाडेकर आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी वर्तमान निळवंडे प्रकल्पाचे अर्धवट कामावर चर्चा करण्यात आली आहे.त्यात नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यात निळवंडे लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही.परिणामी दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर बसू लागल्या आहेत.त्यामुळे अकोले तालुक्यातील कालव्यांच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्यांचे काम तातडीने होणे गरजेचे आहे.परिणामी दोन्ही साईड गटारीतून पाणी नजीकच्या ओढ्यास जाणार आहे.त्यातून शेतकऱ्यांचे शेतात पाणी जाण्यास मज्जाव होणार आहे.मात्र ते करण्यासाठी जलसंपदा विभागाला संगमनेर,नगर रोड येथील महसूल उपविभाग व संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.मात्र सदर दोन्ही विभाग त्याकडे राजकीय नेत्यांच्या सोयीने कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे.त्या बाबत जलसंपदा विभागाने महसूल आणि पोलिस विभागाकडे पाठपुरावा केला आहे.मात्र त्यांना पोलिस बळ व महसूल विभागाचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे.सदरचे कामे तातडीने करणे गरजेचे असल्याने महसूल उपविभाग व पोलिस उपविभाग संगमनेर यांनी पोलिस बळ पुरवून सदरचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी वारंवार करूनही त्या मागणीकडे ही ‘जलनायक’,’जलदूत’, जलपुजनाची मोठी पूर्वपुण्याई’ असलेली राजकीय मंडळी लक्ष द्यायला तयार नाही.त्यामुळे दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांनी जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.या प्रश्र्नी दुष्काळी कार्यकर्त्यांनी जागृत होऊन गावोगाव जाब विचारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,संघटक नानासाहेब गाढवे,सहसंघटक उत्तमराव जोंधळे,बाबासाहेब गव्हाणे,वाल्मीक नेहे,विजय थोरात आदींनी शेवटी केले आहे.