निवडणूक
आगामी दिवस ईशान्य गडाच्या कसोटीचे …!
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
राज्यात निवडणुका जाहीर होऊन दोन दिवस उलटले असून आगामी निवडणुकिसाठी मोठे रणकंदन सुरू झाले असून आता पक्षांतराची मोठी जय्यद तयारी सुरू असून कोपरगाव विधानसभा मतदार संघात महायुतीकडून आ.आशुतोष काळे हे निश्चित समजले जात असले तरी महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारी निश्चित झाली नसली तरी या जागेवर वर्तमानात भाजप मध्ये असलेल्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्यावर दबाव निर्माण झाला असून शिर्डीसाठी विवेक कोल्हे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेकडून मोठी गळ घातली जात आहे.पक्ष निवडीचे स्वातंत्र्य त्यांना दिले जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत.महायुतीचा जागा वाटपाचा टक्का जवळपास निश्चित झाला आहे.पण महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबतची चर्चा गुरूवारपर्यंत सुरूच होती.त्याला यश आल्याचे मानले जात असून महाविकास आघाडीमध्ये १००-८०-८० या टक्क्यांवर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार,महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा अंतिम ठरला असून यात आतापर्यंत २८८ जागांपैकी २६० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे.यामधील १०० जागा काँग्रेस पक्षाला तर उद्धव ठाकरे गटाला ८० आणि शरद पवार गटाला ८० जागा देण्यावर आघाडीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
महाविकास आघाडीने उर्वरीत २८ जागा या मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या २८ जागांवर दोन पक्षांनी दावा केला आहे.हा २८ जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.या जागांवर सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे.येत्या दोन दिवसांत हा तिढा देखील सुटेल आणि जागा वाटपाचा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.येत्या रविवारी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय आगामी दोन दिवसांत जाहीर केला जाणार आहे.मात्र कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे भिजत घोंगडे अद्याप तसेच असून त्यांना भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून जिल्हा बँक,जिल्हा परिषद आदी अमिषे दिले जात आहे.मात्र त्यासाठी ते राजी दिसत नाही.त्यांना विधानपरिषद ही मोठी संधी असताना मात्र त्यासाठी त्यांचा विचार झालेला नाही.त्या रिक्त जागा भाजपने आपला कालखंड संपण्याच्या आधी अन्यत्र देऊन टाकल्या आहेत.त्यामुळे ती संधी मिळत असताना कोल्हे गटाने ती नाकारली आहे.त्यासाठी विवेक कोल्हे यांच्या मातोश्री माजी आ.स्नेहलता वडील बिपिन कोल्हे हे राजी होते अशी माहिती मिळाली आहे.मात्र त्यांचे युवराज (चिरंजीव) विवेक कोल्हे हे त्यासाठी राजी नव्हते.त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान भाजपने त्यांना आपल्या जाळ्यात पुरते फसवले असल्याची माहिती आहे.त्यांनी संजीवनी सहकारी कारखान्याचे १८२ कोटींचे कर्ज अद्याप पदरात टाकलेले नाही.तो हुकमी एक्का अमित शहा यांनी राखून ठेवलेला आहे.त्यातच शिक्षण संस्थेच्या चौकशीचा अहवाल गुलदस्त्यात ठेवून भाजपने त्यांना प्राणवायूवर लटकून ठेवले आहे.त्यामुळे कोल्हेना थेट हत्यार बाहेर काढणे कठीण बनले आहे.त्यामुळे निदान आचारसंहिता जाहीर झाल्यावर तरी कोल्हे आपल्या दंडाच्या बेटकुळ्या भाजपला दाखवतील हा अंदाज सपशेल फोल ठरला आहे.
दरम्यान आज कोल्हे गटाची तातडीची बैठक आज व्हीं.आय.पी.त संपन्न झाली असून त्यात कार्यकर्त्यांचे मनोगते झाली आहे.दरम्यान भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे व संजीवनी सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपिन कोल्हे यांना दुपारी मुंबईसाठी लागलीच निमंत्रण धाडले आहे.त्यांना आदेशबर हुकूम मुंबईकडे धाव घ्यावी लागली आहे.त्यामुळे आज रात्री त्याबाबत भाजप आपले पत्ते खुले करण्याची शक्यता आहे.मात्र त्यांना महाआघाडी कडे जाणे दिवसेंदिवस कठीण होत जात असल्याचे चित्र आहे.त्यांनी आधीच आपल्या मुखात तुतारी निश्चित केली असली तरी त्यांना ती वाजवणे कठीण बनत चालले असल्याचे दिसत आहे.तर दुसरीकडे शिवसेनेची वाढलेली सत्तेची भूक भागवणे त्यांना कठीण जात आहे.नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती जागा वाटप यात मोठा घोळ दिसून येत असून ती मागणी त्यांच्या दृष्टीने कठीण समजली जात आहे.तरी त्यात वरिष्ठ नेत्यांचा आदेश त्यांना शिरसावंद्य राहील त्यामुळे वरिष्ठ पातळीवर त्यांची ‘ मशाल ‘ त्यांना दिशा दाखवणार असल्याचे समजले जात आहे.
दरम्यान नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार महाआघाडीचे नेते शरद पवार यांनी त्यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात विवेक कोल्हे यांना शिर्डीच्या रणांगणात उतरविण्याची मोठी तयारी केली आहे.त्यासाठी त्यांनी सर्व दारूगोळा,मेख,घोडा,त्याचा दानापाणी देण्याची तयारी दाखवली आहे.त्यामुळे शिर्डीची लढत लक्षवेधी होईल व विखे यांना,”लोहा लोहे को काटता है” या न्यायाने मोठा शह दिला जाईल असा कयास व्यक्त होत आहे.तर कोपरगाव तालुक्यात माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना उतरविण्यास सांगितले असल्याची ताजी माहिती आहे.मात्र त्यास पती-पत्नीचा भाजपचा आगामी धोका ओळखून नकार असल्याची माहिती आहे.ईशान्य गडाचे वर्तमान उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठे दुखणे आहे.त्यांचा अंदाज अद्याप त्यांना येईना त्यामुळे ते सैरभैर झाले आहे.राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार वर्तमानात भाजपात अस्वस्थ आहेत त्यांची अलीकडील विधाने त्याची साक्ष आहेत.त्यामुळे ते उद्या पुन्हा तुतारीत आले तर काय ? असा गंभीर सवाल त्यांना सतावत आहे.तर काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी आधीच कोल्हेसाठी पायघड्या अंथरलेल्या आहेत.मात्र काँग्रेसला आता पूर्वीसारखा दलीत मुस्लिम मतांचा पायभूत आधार उरलेला नाही.त्यामुळे आगामी काही दिवस ईशान्य गडाच्या कसोटीचे ठरणार आहे.त्यावर ते कसे मात करणार याकडे कोपरगाव राहता तालुक्यातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
मो.-9423439946.