निवडणूक
कोपरगाव शहर राष्ट्रवादीत आज इंकमिंग होण्याची शक्यता !
न्यूजसेवा
कोपरगाव – (नानासाहेब जवरे )
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवार दि.०८ पासून जनसन्मान यात्रा काढली आहे.राज्यभरात जाणारी हि जनसन्मान यात्रा शनिवार दि.१० ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता सिन्नर मार्गे कोपरगाव शहरात येत असून या निमित्ताने अजित पवार यांचे प्रमुख उपस्थितीत भाजप मधून राष्ट्रवादीत काही पदाधिकारी व माजी नगरसेवक यांची आयात (इंकमिंग) होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार गटाची धुळधाण उडवली आहे.बारामतीमध्ये खा.सुप्रिया सुळे यांच्याकडून राज्यसभेच्या खा.सुनेत्रा पवार यांना पराभूत व्हावे लागले.अजित पवार गटाचे राज्यात एकमेव खासदार म्हणून सुनील तटकरे हे निवडून आले आहे.या निकालातून धडा घेत पक्षाने अर्थसंकल्पातील योजनांमधून लाडकी बहीण ते शेतकरी,युवावर्ग,दूध उत्पादक, मुस्लीम बांधव,मातंग समाज अशा सर्व घटकांना आपलेसे करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.जनसंवाद यात्रेचा प्रकाशझोत केवळ अजित पवार यांच्यावर राहील,याची दक्षता त्यांचे कार्यकर्ते घेत आहे.त्यामुळे या यात्रेतील मेळावे,सभांमध्ये उपस्थित मंत्री वा अन्य ज्येष्ठ नेत्यांना बोलण्याची संधी मिळत नाही.यात्रेत अजित महिला, युवक,शेतकरी,द्राक्ष-कांदा उत्पादक,उद्योजक आदींशी स्वतंत्रपणे संवाद साधत आहेत.राज्यभरात जाणारी हि जनसन्मान यात्रा शनिवार दि.१० ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता सिन्नर तालुक्यातून कोळपेवाडी मार्गे कोपरगाव शहरात येणार आहे.या यात्रेच्या स्वागताची आ.आशुतोष काळे यांनी जय्यत तयारी केली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानात महिलांशी संवाद साधणार आहे.
दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदार संघात राजकीय वातावरण खूपच अस्थिर असल्याचे पहावयास मिळत असून कोण कोणत्या पक्षात जाणार याचा काहीच अंदाज येत नाहीये.कोपरगाव शहरासह देशभरातील मुस्लिम बांधव भाजपवर नाराज आहेत.त्यामुळे येथील सत्ताधारी वर्गावर महाआघाडीत जाण्यास मोठा दबाव आहे.परिणामी सत्ताधारी वर्गाची द्विधा स्थिती दिसून येत असून हा वर्गच विरोधात जाण्याच्या बातम्या येत आहेत.तर भाजपमधील काँग्रेसी संस्कृतीत वाढलेल्या मात्र वर्तमानात भाजप मध्ये सत्तेचे गुलाबजाम चाखत असलेल्यांत मनात मोठी राजकीय अस्थिरता आहे.परिणामी ही ईशान्य गडावरील मंडळी महाआघाडीत जाण्यासाठी प्रयत्नशील आहे.म्हणजेच सत्ताधारी व विरोधक दोन्हीही महाआघाडीत जाण्यास आतुर आहेत. मात्र या वादळात राष्ट्रवादीतील आ.आशुतोष काळे यांना एक समाधान देणारी बातमी हाती येत असून भाजपमधील कोपरगाव जुन्या गावठाण हद्दीतील काही माजी प्रमुख कार्यकर्ते तथा कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यासाठी प्रयत्नशील आहे.मागील महिन्यात माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील नीखाडे,माजी सभापती शिवाजी खांडेकर,नगरसेवक पती व कोल्हे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते बाळासाहेब आढाव आदींनी आ.आशुतोष काळे गटात प्रवेश केला आहे.याशिवाय शिंगणापूर येथील भाजपचे कार्यकर्ते नुकतेच प्रवेशकर्ते झाले आहे.आता भविष्य अंधकारमय दिसत असल्याने उर्वरित काही पदाधिकारी त्याच वाटेने जाण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे आ.काळे गटास वाळवंटातील हिरवळ वाटली तर नवल नाही.