निवडणूक
…या नेत्याने विधानसभा निवडणुकीचे फुंकले रणशिंग !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असल्याने त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन करून आज सायंकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी आज कोपरगाव येथे एका कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग (तुतारी) फुंकले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत तसेच आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार दि.२८ रोजी दुपारी ०५ वा.कृष्णाई बॅक्वेट हॉल कोपरगाव येथे मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा जनसंवाद यात्रा आयोजित केली त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,आ.आशुतोष काळे,नरेश अरोरा,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे,युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,शहराध्यक्ष सुनील गंगुले,सूरज,बाबासाहेब कोते,मंदार पहाडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांना लाडकी योजना आणली असून आपल्या सुशिक्षित भावांना लाडका भाऊ ही योजना आणून त्यांचे दुःख दूर केले असल्याचा दावा केला आहे. व आगामी काळात आपल्या विविध विकासाच्या योजना हव्या असतील तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना मुख्यमंत्री करावे लागेल व त्यासाठी कोपरगावसह राज्यभरात राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणावे लागतील असा दावा केला आहे.कोपरगाव शहरात व तालुक्यात आ.काळे यांनी विविध योजना राबवून जनतेचे मन जिंकले असल्याचा दावा केला असून त्याची परतफेड मतदानातून करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले आहे.
सदर प्रसंगी नरेश अरोरा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना,”कोण कोण आ.आशुतोष काळे यांना मंत्री पाहू इच्छितो असे म्हटले असता सर्वांनी हात वर करून प्रतिसाद दिला तर गर्दीतून एकाने जलसंपदामंत्री करा अशी मागणी टाळ्यांच्या गजरात केली असल्याचे दिसून आले आहे.त्यावेळी अजित पवार यांचा वादा पक्का असल्याचे त्यांनी आपल्या हिंदी भाषणातून शेवटी सांगितले आहे.
दरम्यान आ.आशुतोष काळे यांनी विधानसभा मतदार संघात राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन आगामी दोन महिन्यात आपण शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या पाच क्रमांकाच्या तलावाचे काम पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे.
यावेळी खा.तटकरे यांच्या शुभहस्ते मागील नगरपरिषदेत अपक्ष निवडून आलेले माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांचेसह त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा आढाव यांनी केले तर सूत्रसंचलन अरुण चंद्रे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार सुनील गंगूले यांनी मानले आहे.त्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर प्रसंगी बुडणाऱ्या दोन युवकांना वाचविणाऱ्या मंजूर येथील ताईबाई छबुराव पवार व छबुराव बाबूराव पवार या दांपत्याचा अकरा हजार रुपये व साडी चोळी देऊन सत्कार केला आहे.