दुष्काळ
आगाऊ पिक विम्याचा अध्यादेश काढण्यास विलंब नको-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील सर्वच मंडलात दीर्घ काळ पावसाचा खंड पडल्यामुळे त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.त्यामुळे मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी झाली असून शेतकऱ्यांना तातडीने आगाऊ २५ टक्के पिक विमा देण्यासाठी अध्यादेश काढण्यात विलंब न करता तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे नुकतीच एका पत्राद्वारे केली आहे.
अ.नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा पावसाने हुलकावणी दिली आहे.सुरूवातीला जून महिन्यात पावसाने अवकृपा केली.जुलैमध्ये पेरणीसाठी पाऊस झाला तेवढया पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली त्यानंतर मात्र तो गायब झाला.त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले.बहुतांशी हवामान तज्ज्ञ पावसाने खोटे ठरवले आहे.मधील काळात पावसाचा मोठा पडलेला खंड खरीप पिकांच्या मुळावर आला आहे.अ.नगर जिल्ह्यात सुमारे सरासरी क्षेत्र ०५ लाख ७९ हजार ७६८ हे.असून त्यातील ०४ लाख ८५ हजार ०६९ क्षेत्रावर पेरणी झाली असून सरासरी ती ८४ टक्के असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.हे खरीप क्षेत्र ऐन पीक वाढीच्या अवस्थेत पावसाने खंड दिल्याने अडचणीत आले असून सोयाबीन पिकाने मान टाकली आहे.सोयाबीन,मका,बाजरी,कपाशी आदी पिके पावसापाण्याअभावी खाक झाली आहेत.या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी सालीमठ यांना दिले आहे.
आ. काळे यांनी दिलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की,”कोपरगाव मतदार संघातील सर्वच मंडलात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे खरीप हंगामातील बाजरी,मका,कापूस,तूर, सोयाबीन,भुईमुग आदी पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही याची गांभीर्याने दखल घेवून आ.काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे यापूर्वीच केलेली आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेवून कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना आगाऊ पिक विमा भरपाई द्यावी अशी मागणी देखील केलेली होती.तसेच मतदार संघात दुष्काळ जाहीर करून दुष्काळाची पाहणी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली होती.
त्या मागणीनुसार संपूर्ण कोपरगाव मतदार संघात दुष्काळ परिस्थितीची पाहणी पूर्ण झालेली आहे.कोपरगाव मतदार संघातील एकूण ४५ हजार ०६२ शेतकऱ्यांनी बाजरी,मका,कापूस,तूर,सोयाबीन,भुईमुग,कांदा आदी पिकांचे ६४ हजार ०२३ पिक विमा अर्ज भरलेले आहे.शासन निर्णय व पिक विम्याच्या तरतुदी नुसार खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर,पावसातील खंड व दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पनात घट होणार असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात २५ टक्के पर्यंत नुकसान भरपाई आगाऊ देण्याची तरतूद आहे.याबाबत काही जिल्ह्यात २५ टक्के पिक विमा देण्याबाबत अध्यादेश प्रसिद्ध झाल्याची माहिती वृत्तत्रातून समोर आली आहे.मतदार संघातील शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज असून या मदतीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा नक्कीच मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील शेतकऱ्यांना आगाऊ २५ टक्के पिक विमा देण्यासाठी तातडीने अध्यादेश तातडीने जाहीर करावा अशी मागणी आ. काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेवटी केली आहे.