जलसिंचन
कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या-…यांची मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामाकडे लागल्या आहे.गोदावरी कालव्यातून मिळणाऱ्या आवर्तनातून रब्बी हंगामाच्या नियोजनाची तयारी करता येते मात्र अद्याप कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात अडचणी येत असून त्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घ्या अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी महसुलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत असून रब्बी पिकाच्या माध्यमातून खरीपाची कसर भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.त्यासाठी रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून असलेल्या कालवा सल्लागार समितीची बैठक होवून मिळणाऱ्या आवर्तनाचे चित्र स्पष्ट होणे गरजेचे आहे.
चालू वर्षी सलग दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी हंगामाचे भवितव्य देखील अधांतरी आहे.कमी पाऊस झाल्यामुळे ओढे,नाले पूर्ण क्षमतेने वाहिले नसल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली जावून भविष्यात पाणी टंचाई जाणवणार आहे.त्यामुळे दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे योग्य नियोजन करण्यासाठी तातडीने कालवा सल्लागार समितीची बैठक घ्यावी अशी मागणीआ.आशुतोष काळे यांनी महसुलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.