जलसंपदा विभाग
जलसंपदामंत्र्यांमुळे निळवंडे धरणाची उंची वाढणार !
न्युजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
राज्याच्या मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री म्हणून आता राधाकृष्ण विखे यांचा समावेश झाला असल्याने निळवंडे लाभक्षेत्रातील १८२ दुष्काळी गावातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असून आता पश्चिमेचे पाणी पूर्वेस वळवून निळवंडे धरणाची भिंत वाढवून त्यांची साठवण क्षमता वाढण्याची व कालवे बारमाही होण्याची व दुष्काळी शेतकऱ्यांचे पिण्याचे पाणी आरक्षण टाकण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते गंगाधर रहाणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी येत्या १४ जुलै रोजी ५४ वर्ष उलटले असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.०५ हजार १७७ कोटींवर गेला आहे.त्यासाठी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय जलयोगाकडून १७ पैकी १४ मान्यता मिळवून दिल्या होत्या.दरम्यान कालवा कृती समितीच्या जनहित याचिकेत आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही व उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगी शिवाय आता कोणतीही वाढीव आर्थिक तरतूद करता येणार नसल्याचा इशारा दि.१८ जानेवारी २०२३ रोजी अड.अजित काळे यांच्या मार्फत विक्रांत काले व नानासाहेब जवरे यांनी दाखल केलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत (क्र.१३३/२०१६) दिला होता.त्यानंतर १३ जुलैला २०२४ आर्थिक अधिकार गोठवले होते.त्यानंतर कालव्यांचे काम जलसंपदा विभागाला डावा कालवा मार्च २०२३ अखेर तर उजवा कालवा हा जून २०२३ अखेर पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरले होते.आता अस्तरीकरण व वितरण व्यवस्थेचे तांत्रिक काम उशिरा सुरू झाले आहे ही समाधानाची बाब आहे.मात्र शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी जाण्यास कारणीभूत असणाऱ्या अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्याच्या साईड गटारी जलसंपदा विभागाने अद्याप पूर्ण केलेल्या नाही.शिवाय अद्याप सदर कालवा आठमाही असून तो बारमाही करणे गरजेचे आहे.त्यासाठी साम्रद नाला व उंबरदरा (घाटघर) याद्वारे सुमारे ०२ टी.एम.सी.पाणी उपलब्ध होणार आहे.सदर पाणी मराठवाड्यात जाणे नूतन जलसंपदामंत्री विखे यांना परवडणारे नाही.ते उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना देणे गरजेचे आहे.त्यात संगमनेर तालुक्यातील ८० तर राहाता तालुक्यातील ३७,कोपरगाव १३,राहुरी २१,अकोले २१,सिन्नर ०६,श्रीरामपूर ०४ आदी गावांना फायदा होऊ शकणार आहे.या दुष्काळी १८२ गावांना पिण्याचे आरक्षण त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात अद्याप दिलेले नाही.विशेष म्हणजे राहाता तालुक्यात मंत्री विखे स्वतः तर संगमनेर तालुक्यात त्यांचा उमेदवार अमोल खताळ यांना दुष्काळी मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिलं आहे.राहुरी,कोपरगाव तालुक्यात तीच बाब आहे.त्यामुळे त्याचे दायित्व आता मंत्री विखे यांचेवर आपोआप येत आहे.त्यासाठी त्यांना ‘खरे जलनायक’ व्हायचे असेल तर अशी संधी परत येणार नाही.
दरम्यान गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे आहे.त्यातच पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष होत असतो.पाण्याचा उपलब्धतेच्या मर्यादा लक्षात घेता पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याशिवाय पर्याय नाही.मात्र सरकार निवडणुका पाहून घोषणा करण्यापलीकडे काहीही करत नाही.यापूर्वी जयंत पाटील यांचेकडे पाच वर्षापूर्वी हे जलसंपदा खाते आल्यावर त्यांचे माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी लक्ष वेधून घेतले होते.त्यांनीही चांगला दृष्टीकोन ठेऊन स्वतंत्र प्राधिकरण निर्माण केले होते.मात्र दरम्यान अडीच वर्षात महाआघाडी सरकार जावून महायुतीचे सरकार आल्याने त्यांच्या इच्छा आकांक्षांना सुरुंग लागला होता.मात्र यावेळी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विषय घेतला असून आपली सकारात्मकता दाखलवून दिली आहे ही समाधानाची बाब असताना या खात्याचे मंत्रीपद विखे यांना मिळाल्याने नगर जिल्ह्यातील दुष्काळी शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
नगर-नाशिक आणि दुष्काळी मराठवाडा आदीसाठी एकूण ३० प्रवाही वळण योजना प्रस्तावित असून यापैकी १४ वळण योजना पूर्ण झाल्या असून त्याद्वारे १.०७ टीएमसी पाणी वळविले जात आहे व ५ बांधकामाधीन वळण योजनांद्वारे १.३५ टीएमसी पाणी वळविले जाईल.तर ११ भविष्यकालीन योजनाद्वारे ४.९८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुख्य म्हणजे प्रमुख उपसा वळण योजनेद्वारे जवळपास १५.५५ टीएमसी पाणी वळविण्याचे प्रस्तावित असून त्याअंतर्गत तीन प्रकल्पांवर सध्या काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.या योजनेंतर्गत सध्या काही नदीजोड प्रकल्पांवर काम सुरू आहे.याबाबत निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,रुपेंद्र काले आदींनी गतवर्षी ०५ जानेवारी २०२४ रोजी जनहित याचिका क्रं.०५\२०२४ दाखल केलेली आहे.
पश्चिम वाहिनी (कोकणातील) नद्यांचे पावसाळ्यात अरबी समुदात जाणारे पाणी गोदावरी खो-यात आणण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे गोदावरीच्या खो-यात सुमारे पावणेचार अब्ज घनफूट पाणी येणार आहे.त्याचबरोबर उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात आणखी किती अतिरिक्त पाणी आणता येईल,याचे सर्वेक्षण व प्राथमिक अभ्यास करण्यात येत आहे.सह्यादीच्या पश्चिमेला असणाऱ्या नार,पार,दमणगंगा,औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो.या नद्यांच्या खोऱ्यात दरवर्षी एक हजार ते चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो.हे सर्व पाणी आरबी समुदाला जाऊन मिळते.पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर सरकारने पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी आणण्यासाठी प्रवाही वळण योजनांना मान्यता दिली आहेत.त्यात १७ प्रवाही वळण योजना व चार लघु प्रकल्पांचा समावेश आहे.या योजनेमुळे सुमारे पावणेचार अब्ज घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यात येणार आहे.त्यात वैतरणा प्रकल्पातून एक अब्ज घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे.या योजनांपैकी मांजरपाडा योजनेत औरंगा नदीच्या खोऱ्यातून साडेआठ किलो मीटरचा बोगदा खोदून गोदावरी खोऱ्यात पाणी आणले जाणार आहे.या सर्व योजना प्रवाही वळण पद्धतीच्या आहेत.
दमणगंगा आणि पार खोऱ्यात महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये केंद्रीय जल आयोगा नुसार अनुक्रमे ५५ व २९ टीएमसी प्रमाणे एकूण ८४ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.या पश्चिमवाहीनी दमणगंगा-नार-पार,औरंगा व अंबिका या नदी खोऱ्यातील महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पश्चिमेकडे समुद्राला व गुजरातमध्ये वाहून जात आहे.दमणगंगा व नार पार खोऱ्यातील पाणी पूर्वेकडे दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह नाशिकच्या पूर्व भागात वळविण्यासाठी मंत्री विखे यांनी राज्यांतर्गत महत्वाकांक्षी प्रकल्प राबवावा असे आवाहन शेवटी गंगाधर रहाणे यांनी शेवटी केले आहे.आता यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे हे काय भूमिका घेणार याकडे निळवंडे कालवा कृती समिती आणि दुष्काळी शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.