जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

गोदावरी नदीपात्रात सोडले पाणी,शेतकऱ्यांकडून निषेध !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   गेल्या दोन चार दिवसांपासून नांदूर मधमेश्वर धरणांतून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून शासनाने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या जखमेवर जणू मीठ चोळले असल्याची भावना कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती तथा प्रगतशील शेतकरी सुनिल अंबादास देवकर यांनी व्यक्त करत जलसंपदा विभागाचा निषेध व्यक्त केला आहे.

  

“कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची स्थिती प्रतिकूल झाली असताना पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात सोडलेले जायकवाडीच्या दिशेने जाणारे हे पाणी जर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यात सोडले असते तर परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देता आले असते.मात्र जलसंपदा विभागाने गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रावर अन्याय केला आहे”-सुनील देवकर,माजी सभापती,कोपरगाव पंचायत समिती.

   मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर,जालना,बीड,परभणी या जिल्ह्यांसाठी संजीवनी असलेल्या व गोदावरी नदीवर पैठणजवळ बांधण्यात आलेल्या जायकवाडी धरणामध्ये गत १५ ऑक्टोबर रोजी एकूण पाणीसाठा ६२.२१०५ टीएमसी (६०.५६ टक्के) व उपयुक्त पाणीसाठा ३६.१४४३ टीएमसी (४७.१४ टक्के) इतका होता.गेल्या वर्षीच्या उपयुक्त पाणीसाठ्यापेक्षा तो सुमारे ४० टीएमसी (५३ टक्के) कमी होता.त्यामुळे या जिल्ह्यांतील सिंचनावर मोठा परिणाम होणार झाला होता.जायकवाडी धरण बांधताना धरणस्थळी उपलब्ध पूर पाण्याचा अंदाजित येवा लक्षात घेऊनच या धरणाचा एकूण पाणीसाठा १०२.७३ टीएमसी निश्चित करण्यात आला होता.त्यावेळी वरच्या धरणावर कोणताही परिणाम होणार नाही.जायकवाडीत येणारे पाणी हे दुसऱ्या राज्यात रोखण्यासाठी या प्रकल्पाची निर्मिती झाली होती.मात्र मराठवाड्यातील आमदारांची डोकी विचारात घेऊन आता कुरघोड्या सुरू आहेत.व नगर-नाशिक मधील लोकप्रतिनिधी मौनी बाबा बनले आहे.आता मराठवाड्यातील ही मंडळी आता जायकवाडी धरणाच्या वरच्या भागामध्ये गोदावरी नदीच्या खोऱ्यात नाशिक व नगर जिल्ह्यात जनतेच्या मागणी ‌व गरजेनुसार मोठ्या प्रमाणात धरणे बांधण्यात आरोप करून त्यामुळे वरील भागाचा पाणीवापर जवळपास ११५ टीएमसीपर्यंत गेलेला असल्याचा आरोप करत आहे.तो भविष्यात १४५ ते १५० टीएमसीपर्यंत जाऊ शकतो असेही म्हटले जात आहे.परिणामी मराठवाडा विरुद्ध नाशिक-नगर हा संघर्ष सातत्याने उग्र रूप धारण करत आहे.या सर्व बाबींच्या व अडचणींच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा धार्जिणा असा असलेला २००५ मध्ये सरकारने समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर केला.त्यासाठीच्या मेंढीगिरी समितीच्या काही शिफारशी स्वीकारण्यात आल्या.त्यावेळी नगर-नाशिक जिल्ह्यातील पुढारी व लोकप्रतिनिधींनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवले होते.परिणामी आता वरील धरणात पुरेसा साठा नसताना हे पाणी सोडले जात आहे.व त्याची किंमत शेतकऱ्यांना चुकवावी लागत आहे.आजही तिच स्थिती उदभवली असून या बाबत कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी आवाज उठवला आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असतांना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी शेतात हजारो रुपये घालत पेरणी केली आहे परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस पडला नसल्याने शेतकरी राजा मेटाकुटीला आला असून अनेकांचे विंधन विहिरी व पारंपरिक विहिरींनी देखील तळ गाठला आहे.तर विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह गाव खेड्याना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारी पाणी साठवण तलावाने देखील तळ गाठल्यान पिण्याचा पाण्याचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून कोपरगाव शहरातील नागरिकांना तर १२ दिवसाआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे.

   कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची स्थिती प्रतिकूल झाली असताना पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात सोडलेले जायकवाडी च्या दिशेने जाणारे हे पाणी जर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यात सोडले असते तर परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देता आले असते यामुळे बंद पडलेल्या विहिरी व बोअरवेल देखील सुरू झाले असते आणि विशेष म्हणजे गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे तलाव भरले गेले असते या मुळे शहरासह नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असता परंतु पाटबंधारे खात्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने नियोजन करत ऐन दुष्काळात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर व नागरिकांवर अन्याय केला असल्याची भावना सुनील देवकर यांनी व्यक्त करत नाशिक जलसंपदा विभागाचा आमच्या प्रतिनिधींशी बोलताना निषेध व्यक्त केला आहे.

  माजी सभापती सुनील देवकर हे कोल्हे गटाचे समर्थक मानले जातात.ते हा आवाज कुठंपर्यंत उठवणार असा सवाल निर्माण झाला आहे.ईशान्य गडावरून डोळे वटारले तर त्यांची नामुष्की होऊ शकत असल्याची शेतकऱ्यांत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.ते कुठं पर्यंत टिकतात ते आगामी काळ ठरवणार असला तरी आज त्यांनी सर्व प्रथम आवाज उठवला हे ही नसे थोडके.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close