कोपरगाव शहर वृत्त
नगरपरिषदेने भूमिगत गटारीचे काम सुरु करावे-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील प्रभाग क्र.९ मधील भूमिगत गटारीच्या कामाला मुहूर्त लागत नसल्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून याची गंभीर दखल घेवून कोपरगाव नगरपरिषदेने तातडीने भूमिगत गटारीचे काम सुरु करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी गटनेते नगरसेवक विरेन बोरावके यांनी नुकतीच केली आहे.
“उघड्या गटारीमुळे डासांचे साम्राज्य निर्माण होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून बूब हॉस्पिटल ते बँक कॉलनी व डॉ.भगवान शिंदे हॉस्पिटल पर्यंत भूमिगत गटारीच्या कामासाठी १० लाख रुपये निधी देण्यात आला आहे.या कामासाठी संबंधित ठेकेदाराला आदेश देवून देखील आजपर्यंत काम सुरु झालेले नाही हे विशेष”-विरेन बोरावके,माजी नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव शहरातील प्रभाग क्र.९ मधील धारणगाव रोड वरील बूब हॉस्पिटल समोरील बँक कॉलनी ते डॉ.भगवान शिंदे हॉस्पिटल पर्यंत भूमिगत गटारीच्या कामाची निविदा प्रसिद्ध होवून या कामाची संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देवून जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे.मात्र आजपर्यंत संबंधित ठेकेदाराला हे काम सुरु करण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
उघड्या गटारीमुळे डासांचे साम्राज्य निर्माण होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून बूब हॉस्पिटल ते बँक कॉलनी व डॉ.भगवान शिंदे हॉस्पिटल पर्यंत भूमिगत गटारीच्या कामासाठी १० लाख रुपये निधी देण्यात आला आहे.या कामासाठी संबंधित ठेकेदाराला आदेश देवून देखील आजपर्यंत काम सुरु झालेले नाही.त्यामुळे हे काम तातडीने सुरु करावे व प्रलंबित असलेली विकासकामे देखील तातडीने सुरु करावी अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा बोरावके यांनी शेवटी दिला आहे.