कोपरगाव शहर वृत्त
भाजप गटाच्या माध्यमांबाबत माकडचेष्टा सुरू !

न्यूजसेव
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषदेची आज दुसरी सर्वसाधारण सभा सकाळी ११ वाजता सुरू झाली असून त्यासाठी या सभेत पत्रकारांना प्रतिबंध केला असून हा जनतेचा अपमान असून पारदर्शक कारभाराचा बळी घेतला जात असल्याचा आरोप कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक महमूद सय्यद यांनी नुकताच केला आहे.त्यामुळे सत्ताधारी वर्गाच्या कारभाराबाबाद शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत महिला मालक असलेल्या घरमालकांना पन्नास टक्के घर आणि पाणी पट्टी माफीचा प्रस्ताव मांडला असता तो पीठासन अधिकारी पराग संधान यांनी फेटाळला असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या गटनेत्या गौरी मंदार पहाडे यांनी दिल्याने नगरपरिषद हद्दीत महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक दि.२० डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाली आहे.त्यात भाजप कोल्हे गटास १९ जागा तर काळे गटास ०१ जागा तर शिवसेना बंडखोर गटास ०४ जागा प्राप्त झाल्या आहेत.आता स्वप्न रंजन संपून आता खऱ्या अर्थाने सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षांचा कारभार सुरू झाला आहे.त्यातच ०३ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीची पहिलीच बैठक नगराध्यक्ष पराग संघान यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यात त्यांनी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली असल्याचे मानले जात आहे.आज गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दुसरी सर्वसाधारण सभा सुरू झाली असून त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गौतम बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत अपघाती आणि अकस्मात मृत्यू होतात त्यांना उचलून घेऊन तातडीने उपचार करण्याचे सामाजिक काम रुग्णवाहिका चालक अमित कोल्हे हे इमाने इतबारे करत आहे त्यांना नगरपरिषदेच्या वतीने अल्पस्वल्प मानधन द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मेहमूद सय्यद यांनीं केली असता ती सत्ताधारी भाजप कोल्हे गटाने फेटाळून लावल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी निषेध व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवक मंदार पहाडे,गटनेत्या गौरी पहाडे,अन्य नगरसेवक उपस्थित होते.

कोपरगाव नगरपरिषदेच्या आज सकाळी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत महिलांना बोलू देण्यास प्रतिबंध केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला असून या अर्थसंकल्पात महिलाना मालमत्ता करात सवलत देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी ही मागणी भाजप कोल्हे गटाने फेटाळली असून हे मतदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सत्ताधारी भाजप कोल्हे गटाने केले असल्याचा आरोप नगरसेवक जनार्दन कदम यांनी केला आहे.त्यामुळे त्यांची आगामी रणनीती उघड झाल्याचे बोलले जात आहे.
त्या यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजप कोल्हे गटावर हल्ला चढवला आहे.त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भारतीय लोकशाहीत पत्रकार हा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो.तो भारतातील उपेक्षित घटकाना न्याय देण्याचे आणि विरोधकांचा आवाज बनण्याचे काम करून सामाजिक प्रश्न आणि जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावत असतो.मात्र वर्तमानात कोल्हे गटाला पत्रकारांची फार मोठी अडचण झालेली दिसत आहे.पूर्वी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे ज्या सभागृहात पत्रकारांना सामावून घेत होते.त्याच सभागृहात आता पत्रकारांना जागा उरली नाही म्हणणे ही सत्ताधाऱ्यांना पत्रकारांची किती अडचण होते ते दर्शवत असून त्याची जनतेप्रती अनास्था किती आहे हे वास्तव दर्शवत आहे.त्यामुळे या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.पत्रकार हा समाजाचा आरसा आहे.आणि सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात काय करत आहे हे समाजाला आणि मतदारांना समजत असते.मात्र सत्ताधारी यातून कोणते पुण्य कमावत आहे हे कळायला मार्ग नाही.

दरम्यान सर्वसाधारण सभा संपल्यावर सत्ताधारी गटाच्या एका नगरसेवकाने राष्ट्रवादीच्या नगरसेवकाशी बोलताना आपण पत्रकारांना बाहेर कसे ठेवले असा सवाल करून टाळी घेतल्याची गंभीर बाब उघड झाल्याने पत्रकारांनी संबंधित गटाच्या नगरसेवकाचा निषेध केला असून सत्ताधारी गटाच्या या माकडचेष्टा फार दिवस चालणार नाही अशी कोपरखिळी माध्यम प्रतिनिधींनी मारली आहे.
दरम्यान एका माहितीनुसार सत्ताधारी भाजपचे नगराध्यक्ष आणि पदाधिकारी असल्याने त्यांनी पंतप्रधानांचा इस्रायल दौरा संपन्न होत असल्याने ते संरक्षणाशी संबंधित गोपनीय काम करत असल्याची गोपनीय माहिती आणि देशाच्या हिताशी संबंधित निर्णय घेत असल्याची माहिती हाती आली असून ते आयर्न ड्रोन खरेदीला सल्ला देण्याचे काम करण्यासह अन्य कोणती हत्यारे आगामी काळात देशाला महत्वाची ठरणार आहे याचे मंथन करत आहे.दरम्यान याची माहिती शत्रू राष्ट्राला मिळू नये यासाठी माध्यमांना आपल्या सर्वसाधारण सभेपासून दूर ठेवत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे जनतेने माजी आ.कोल्हे गटाच्या नेत्यांना आणि नगरसेवकांना धन्यवाद दिले असल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला असल्याची माहिती कळत आहे.



