कोपरगाव शहर वृत्त
…या शहरात बिबट्या नागरिकांत घबराट !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या अंबिकानगर,टाकळी फाटा परिसरात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा संचार वाढला असून साईनगर प्रभागात बुधवारी रात्री बिबट्या फिरताना आढळून शहर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

“गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरासह जिल्ह्यात सातत्याने बिबट्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर आढळून येता आहे.तसेच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत.मानव-बिबट यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी ठोस धोरणआखण्याची गरज आहे अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो”-विजय वाजे,माजी उपनगराध्यक्ष,कोपरगाव नगरपालिका.
अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या,त्याचे मानवी वस्तीवरील हल्ले हा चिंतेचा विषय ठरू पाहत आहे.आता ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात बिबट्याचा वावर वाढला आहे.अधिवास सोडून भरदिवसा बिबट्या गाव,शहरांच्या वेशीवर पोहचला असून मानव-बिबट यांच्यातील संघर्ष वाढला आहे. जिल्ह्यात सहा वर्षात १४ हजार ४४२ हून अधिक हल्ले बिबट्यांनी केले आहेत.यात नागरिकांसह पशूधनाची हानी झालेली आहे.कोपरगाव शहरातील नागरिकांना याचा अनुभव येत आहे.कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या अंबिकानगर,टाकळी फाटा परिसरात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा संचार वाढला असून साईनगर प्रभागात बुधवारी रात्री बिबट्या फिरताना आढळून आला आहे.परिणामी नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.

दरम्यान याबाबत स्थानिक नागरिकांनी वनविभाग व पोलीस प्रशासनाला माहिती दिली आहे,अशी माहिती भाजपचे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी दिली आहे.या गंभीर समस्याकडे वनविभागाने तातडीने लक्ष घालून पिंजरे लावून हे बिबटे जेरबंद करावे,अशी मागणी वाजे यांनी केली आहे.सध्या बिबट्या मानवी वस्तीजवळ आल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वनविभागाकडून पिंजरा लावण्याची तयारी सुरू असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.नागरिकांनी रात्री उशिरा घराबाहेर जाणे टाळावे.लहान मुले व वृद्ध व्यक्तींना एकटे सोडू नये. पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. बिबट्याचा कोणताही ठावठिकाणा किंवा हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभाग किंवा पोलिसांना माहिती द्यावी.आपली सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. वनविभागाने अलर्ट मोडवर राहुन याबाबत तातडीने ठोस भूमिका घेवून पिंजरे लावून परिसरात फिरणारे बिबटे जेरबंद करावे, अशी मागणी शेवटी वाजे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.