कोपरगाव शहर वृत्त
चौदा वर्ष वनवासाला जाणाऱ्या प्रभू श्रीरामाचा आदर्श घ्यावा-महंत रामगिरीजी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या क्षणाचे साक्षीदार होता आले.पितृ वचनाचे पालन करण्यासाठी हसतमुखाने राज्याचा त्याग करून चौदा वर्ष वनवासाला जाणाऱ्या प्रभू श्रीरामाचा आदर्श घ्यावा.जरी आपण अयोध्येला प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जावू शकत नसलो तरी आपल्या गावातील मंदिरात हा सोहळा साजरा करावा असे आवाहन श्री क्षेत्र गोदावरी धामाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे.२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार सून १६ जानेवारीपासूनच त्याच्याशी संबंधित विविध विधींना सुरुवात झाली आहे.प्राणप्रतिष्ठेचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा तर मूर्तीमध्ये प्राण अर्थात जीव प्रस्थापित करणे.वेद आणि पुराणांमधील विविध परंपरांनुसार हा विधी पार पाडला जातो.त्यासाठी देशभरातून साधुसंत हजेरी लावणार आहे.त्याची तयारी कोपरगावातही मोठ्या उत्साहात सुरु असून त्यासाठी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी काल बुधवार दि.१७ जानेवारी रोजी सायंकाळी ०६ वाजता हा कार्यक्रम साधू-संतांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी श्री क्षेत्राचे महंत रामगिरीजी महाराज,कोपरगाव बेट येथील रमेशगिरीजी महाराज,परमानंद महाराज आदीना निमंत्रित केल्याने जिल्ह्यात वेगळाच उत्साह दिसून येत आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव मतदारसंघातील विविध देवस्थानचे संत-महंत,तसेच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार,मृदुंगाचार्य,गायनाचार्य व भजनी मंडळ तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन,व्हा. चेअरमन,सर्व संचालक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक व श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,” जिल्ह्यातील प्रभू रामचंद्रांचे भाविकांनी भजन करावे.प्रभू श्रीराम ज्यावेळी श्रीलंकेहून रावणाचा वध करून अयोध्येत परत आले त्यावेळी अयोध्येत गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याप्रमाणे हा उत्सव साजरा करून घरोघरी श्रीराम दिप लावून दिपोत्सव साजरा करावा असे आवाहन शेवटी केले.त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”संतांचा सन्मान व पूजन करणे स्तुत्य उपक्रम असून धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आ.काळे यांनी कोकमठाण येथे पार पडलेल्या संत सदगुरु गंगागिरी महाराजांच्या ऐतिहासिक १७५ व्या अखंड हरीनाम सप्ताहासाठी १७५ पोती साखर व ५१ लाख रुपये मदत केलेली आहे.व भविष्यात देखील श्री क्षेत्र सराला बेटाची सेवा करण्याची त्यांची इच्छा होती.त्यामुळे त्यांनी श्री क्षेत्र सराला बेट (गोदाधाम)च्या गो-शाळेची जबाबदारी त्यांनी घेतली असून त्यांच्या हातून यापुढील काळात देखील असेच सत्कार्य घडत राहील असा आशावाद व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे म्हणाले की,”अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधू-संत-महंतांबरोबरच महंत रामगिरीजी महाराज,रमेश गिरीजी महाराज,परमानंद महाराज यांना मतदार संघातील साधू-संत व महंतांच्या वतीने विशेष निमंत्रित करण्यात आले हि आपणा सर्वांसाठी भाग्याची व अभिमानाची गोष्ट आहे.त्यामुळे त्यांचे पूजन करणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे.अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची पाचशे वर्षापासूनची प्रतीक्षा २२ जानेवारीला पूर्ण होत आहे.पवित्र अयोध्येच्या भूमीत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जावून श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे हा प्रत्येक श्रीराम भक्तांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे.अनेक शतकातून एकदा अशा गोष्टी घडतात.आपण रामयुग पाहिलेले नाही,धार्मिक ग्रंथात ऐकलेले आहे.आपण रामयुगात नव्हतो पण राम मंदिर बांधण्याच्या युगात आहोत याचा आपणा सर्वासह मला देखील अभिमान वाटतो.त्यामुळे हा अभूतपूर्व क्षण व हा दिवस मतदार संघातील श्रीराम भक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून दारात दिप लावून दिवाळीसारखा साजरा करावा असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी टाळ मृदुंगाच्या गजरात साधू संत-महंतांचे आगमन,टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झालेले महिला पुरुष वारकरी,प्रभू श्रीराम,माता सीता,भ्राता लक्ष्मण,श्रीराम भक्त हनुमान व माता शबरीची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी कोपरगावकरांचे लक्ष वेधले.श्रीराम भक्तांना श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जरी शरीराने जाता येणार नसले तरी श्रीराम भक्तांना मनाने अयोध्येला घेवून जाणारा अभूतपूर्व सोहळा ठरला.यावेळी ‘प्रभू श्रीरामांच्या’ जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड हिच्या सुमधुर भक्तीगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.