कृषी व दुग्ध व्यवसाय
कोपरगाव कृषी विभागाची खरीप हंगामपूर्व बैठक संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
याहीवर्षी चांगल्या प्रकारचे पर्जन्यमान होणार आहे असे गृहीत धरून कृषी विभागाने खरीप हंगामाची पूर्व तयारी करतांना शेतकऱ्यांना खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच मुबलक बियाणे व खते उपलब्ध होतील असे नियोजन करावे अशा सूचना साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.
“नेमेचि येतो पावसाळा” या उक्ती प्रमाणे या खरीप आढावा बैठका आहेत.कृषी विभागाची विस्तार यंत्रणा कोणत्याच हंगामात दिसत नाही.या उलट खासगी बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी,कृषी सेवा केंद्र चालकच विस्तारकाची भूमिका पार पाडतात.त्यांच्या भरवशावरच शेतकऱ्यांचे खरीप,रब्बी हंगाम यशस्वी होतात असा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे”
आ.काळे यांनी नुकतीच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कोपरगाव तहसील कार्यालय येथे खरीप आढावा व नियोजन बैठक घेतली.या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी बाबत चर्वित-चर्वण केले आहे.
सदर प्रसंगी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कृषी अधिकारी पंडित वाघिरे,मंडल कृषी अधिकारी चांगदेव जवणे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,आनंदराव चव्हाण,काकासाहेब जावळे,अशोक काळे,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,अनिल कदम, श्रावण आसने,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,विजय जाधव,एम.टी.रोहमारे,संदीप रोहमारे,रोहिदास होन,बाळासाहेब वारकर,भाऊसाहेब भाबड,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,राजेंद्र खिलारी,विठ्ठल जावळे,कौसर सय्यद,गणेश घाटे,सर्व सरपंच,उपसरपंच,कृषी विभागाचे शैलेश आहेर,आदिनाथ चंदन,कृषी सहाय्यक व शेतकरी आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की,”मागील दोन वर्षापासून कोरोनाचे संकट असतांना देखील कृषी विभागाने नियोजन केल्यामुळे शेतकऱ्यांना कमी अडचणी जाणवल्या असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे यावर्षी देखील योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारी बियाणे व दर्जेदार खते खरीप हंगामापूर्वी उपलब्ध झाली पाहिजे असे हंगामपूर्व नियोजन करा. शेतकऱ्यांना खताची व बी-बियाणांची कमतरता पडणार नाही याची काळजी घ्या. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या पिक विमा योजना व अनुदान योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना अशा योजनांचा फायदा मिळवून द्या.गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांनी ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरावे.जेवढी मागणी जास्त येईल तेवढे पाणी हक्काने पाटबंधारे विभागाकडून घेता येते.अनेक लाभधारक शेतकरी ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरीत नाही.त्यामुळे पाणी मागणी अर्ज कमी दाखल झाल्यास कमी पाणी मिळत आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज दाखल करावे असे आवाहन आ.काळे यांनी यावेळी केले.