इतिहास
‘हेरीटेज वॉक’ मुळे ऐतिहासिक वास्तू कुतुहूल- प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील इतिहास न वाचता तो प्रत्यक्ष अनुभवणे गरजेचे आहे. ‘हेरीटेज वॉक’ मुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल कुतुहूल व जाणीव निर्माण होते.स्थानिक इतिहास जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन के.जे.सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“पेशवे काळात या राघोबा दादा वाड्याचे महत्व होते.मराठा सत्तेचा अटकेपार झेंडा लावणारे तसेच एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व असलेले राघोबा दादा पेशवे यांचे या वाड्यामध्ये अनेक वर्ष वास्तव्य होते” – डॉ.दिलीप बागुल,इतिहास विभाग प्रमुख,सोमैया महाविद्यालय,कोपरगाव.
‘ हेरिटेज वॉक’ म्हणजे एखाद्या शहराच्या ऐतिहासिक,सांस्कृतिक आणि वास्तूशिल्पीय वारशाची ओळख करून घेण्यासाठी आयोजित केलेली मार्गदर्शनपर पायी फेरी होय.ही एक गट-आधारित मोहीम असून,यामध्ये तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जुने वाडे,मंदिरे,किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन इतिहास जाणून घेतला जातो.हेरिटेज वॉकमुळे स्थानिक संस्कृतीचे जतन आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळते.कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर इतिहास विभागाच्या वतीने कोपरगाव शहरातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या ‘पेशवे राघोबादादा वाडा’ येथे नुकतेच ‘हेरीटेज वॉक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी इतिहास विभाग प्रमुख डॉ.दिलीप बागुल,मराठी विभाग प्रमुख प्रा.संपत आहेर,प्रा.प्रवीण मोरे,प्रा.अमोल बंद्रे आदिसंह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.या उपक्रमाअंतर्गत सोमैया महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पेशवे राघोबादादा वाडा येथे भेट देत इतिहासाचा साक्षात अनुभव घेतला.स्थानिक ऐतिहासिक वारशाची जपवणूक आणि जनजागृती हा या उपक्रमाचा हेतू होता.
सदर प्रसंगी अधिक माहिती देतांना इतिहास विभाग प्रमुख डॉ.दिलीप बागुल म्हणाले की,”पेशवे काळात या राघोबा दादा वाड्याचे महत्व होते.मराठा सत्तेचा अटकेपार झेंडा लावणारे तसेच एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व असलेले राघोबा दादा पेशवे यांचे या वाड्यामध्ये अनेक वर्ष वास्तव्य होते.या वाड्याचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम व रचना वाडा बघितल्यावर लक्षात येते.त्यामुळे राघोबा दादा वाड्याचे मराठ्यांच्या इतिहासाबरोबरच कोपरगावच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे.” या हेरीटेज वॉक दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारत या ऐतिहासिक वारशाबद्दल आपले कुतुहूल व्यक्त केले आहे.



