आंदोलन
शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल मंत्र्यांच्या मतदार संघात बिऱ्हाड मोर्चा !

न्यूजसेवा
राहाता (वार्ताहर)
सुमारे आठ दिवसांपुर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत व पिकविमा मिळावा या मागणीचे निवेदन तहसिलदारांना देवुनही शेतकऱ्यांना कुठलीही शासकीय मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने महिला,मुला-बाळासह,आपले पशुधन व बैलगाड्यांसोबत राहाता तहसिल कार्यालयावर लोणी खुर्दच्या कृषीभूषण प्रभाताई घोगरे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या मतदार संघातच बिऱ्हाड मोर्चा काढला होता त्याला शेतकऱ्यांचामोठा प्रतिसाद लाभला असल्याचे दिसून आले आहे.
“आम्ही शेतकरी आहोत हा आमचा गुन्हा नाही.शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यायला हवे.सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मुलभूत गरजांकडे लक्ष न देता भौतिक गरजांकडेच लक्ष देत आहे.शहरात बुलेट ट्रेन व मोठे रस्ते तयार करण्याकडे सरकारचे लक्ष आहे.मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानिकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न भिषण आहेत,ते मार्गी लागले तरच महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होईल”प्रभाताई घोगरे,कृषिभूषण महिला शेतकरी,लोणी खु.
शेतकऱ्यांनी काढलेल्या या बिऱ्हाड मोर्चात सुरेश थोरात,जनार्दन घोगरे,सुधीर म्हस्के,श्रीकांत मापारी,नानासाहेब शेळके,विठ्ठलराव शेळके,रमेश गोंदकर,महेंद्र शेळके,अशोक कोते,शंकरराव लहारे,पंकज लोंढे,रुपेंद्र काले,उत्तम घोरपडे,बाबासाहेब कोते आदींसह शेतकरी,महिला मुलाबाळांसह व पशुधनासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तहसिल कार्यालयाच्या पटांगणात शेतकरी महिलांनी राहुटी टाकुन चुलीवर भाकरी व चटणी बनवत ठिय्या दिला.सुरुवातीस शेतकऱ्यांना तहसिल कार्यालय परीसरात पोलीसांनी प्रवेश नाकारल्यामुळे पोलीस व शेतकरी,महिला यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली.अखेर शेतकरी महिलांनी बळजबरीने प्रांगणात प्रवेश केल्यानंतर पोलीसांनी वातावरण तापु नये म्हणुन मोर्चेकऱ्यांना प्रांगणात सोडले.
याप्रसंगी बोलतांना प्रभाताई घोगरे म्हणाल्या,”आम्ही शेतकरी आहोत हा आमचा गुन्हा नाही.शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यायला हवे.सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मुलभूत गरजांकडे लक्ष न देता भौतिक गरजांकडेच लक्ष देत आहे.शहरात बुलेट ट्रेन व मोठे रस्ते तयार करण्याकडे सरकारचे लक्ष आहे.मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानिकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न भिषण आहेत,ते मार्गी लागले तरच महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होईल. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे मिळु द्या,शेतकरी स्वाभिमानाने जगला पाहिजे.आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी आहे.शेतकरी कष्टाचे जिवन जगतो आहे,त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी केली ? या सर्व गोष्टींकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.जोपर्यंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही हा बिऱ्हाड मोर्चा हलवणार नाही. शेकऱ्यांच्या बाबतीत ठोस निर्णय न घेतल्यास आम्ही न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावणार आहोत असा इशारा त्यांनी यावेळी शेवटी दिला आहे.
तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी,तालुक्यातील शेतकऱ्याने प्रधानमंत्री पिकविमा योजनेत खरीपासाठी विमा हप्ता भरलेला असतांना काही शेतकऱ्यांना अत्यल्प परतावा मिळाला तर काहींना अद्याप मिळालेला नाही.त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात पिकविमा परतावा मिळावा.तसेच अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बहुतांश गावाचे शिवार वाहिने रस्ते वाहुन गेले आहेत.त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.तरी या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी,अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी सर्वांना चटणी-भाकर वाटण्यात आली.तहसिल कार्यालय परीसराला पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.