आंदोलन
कोपरगावात सांडपाणी निचऱ्यासाठी वकिलांचे आंदोलन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील साईनगर उपनगरात मोठी लोकवस्ती असलेल्या परिसरात घरातील सांडपाणी व पावसाचे निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रश्नी नुकतेच येथील वकील अड्.योगेश खालकर यांनी या पाण्यात बसून आंदोलन करुन नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान कोपरगाव शहरातील साईनगर या उपनगरातील निर्माण होणाऱ्या सांडपाण्याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही.त्यामुळे आज संतापून या भागातील तरुण वकील योगेश खालकर यांनी पावसाच्या पाण्यात बसून आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.त्याबाबत शहरात मोठी चर्चा सुरु आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या पश्चिमेस साधारण एक कि.मी.अंतरावर साईनगर हे उपनगर आहे.या ठिकाणी नागरिकांची मोठी लोकवस्ती आहे.याशिवाय शाळा,कन्या प्राथमिक शाळा आदी आस्थापने आहे.मात्र या परिसरात नागरिकांचे सांडपाणी व पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था पालिकेने केलेली नाही.त्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे डास आणि सूक्ष्म कीटकांचे मोठे साम्राज्य पसरले आहे.त्याचा उपद्रव होऊन नागरिकांना डेंग्यू,मलेरिया,आदी गंभीर रोगाचा सामना करावा लागून आरोग्यावर लाखो रुपये खर्च होत आहे.
दरम्यान या बाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही.त्यामुळे आज संतापून या भागातील तरुण वकील योगेश खालकर यांनी पावसाच्या पाण्यात बसून आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
या प्रकरणी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी कार्यवाही करावी अशी मागणी अड् खालकर यांनी केली आहे.या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात नागरिकांना बरोबर घेऊन मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी शेवटी दिला आहे.



