आंदोलन
पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करा…या संघटनेची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज चौकात तरुणावर जीवघेणा हल्ला होऊन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याचेवर जुजबी कलमे लावून गंभीर गुन्ह्याचे कलमे लावण्याचे टाळले असून आरोपीस अभय दिले असल्याचा आरोप करून आदिवासी युवकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी योग्य कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपींवर तात्काळ कारवाई करावी,रामकृष्ण कुंभार या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करून तरुणास न्याय न मिळाल्यास आपण आदिवासी समाजाच्या वतीने आगामी 04 मार्च रोजी मोर्चा काढणार असल्याचा इशारा एकलव्य समाज संघटनेचे अध्यक्ष उत्तम पवार व कार्याध्यक्ष निलेश ठाकरे यांनी दिला आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा काहीही प्रकार झालेला नाही.त्याबाबत कार्यालयातील चलचित्रण उपलब्ध आहे.उलट आपण आणि आपल्या अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितलं आहे.वैद्यकीय प्रमाणपत्र साधे असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसे प्रमाणपत्र न दिल्याने गंभीर गुन्ह्याची कलमे लावणे अवघड असल्याचे आपण सांगितले आहे व केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी राहुल पवार हा कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवासी असलेला आदिवासी तरुण कोपरगाव येथील न्यायालयाच्या तारखेस हजर राहून घरी परतत होता.नेमक्या त्याच वेळी जुन्या वादाच्या कारणावरून छत्रपती संभाजी महाराज चौकात काही आरोर्पीनी दबा धरून त्याच्यावर धारदार शस्त्राने जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर हल्ला केला होता.सदर हल्ल्यात राहुल पवार याच्या डोक्यावर व पाठीवर गंभीर व खोल जखमा झाल्या असून त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या शरीरावर तब्बल ५० टाके घालावे लागले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“सदर प्रकरणात आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केलेला असताना देखील गुन्हा नोंद करताना पोलिस अधिकारी कुंभार यांनी फक्त भारतीय दंड संहिता कलम ३२४ व ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रत्यक्षात या प्रकरणात जीवे मारण्याचा प्रयत्न कलम ३०७ लागू होणे आवश्यक होते.तसेच विद्यमान भारतीय न्याय संहितेनुसार कलम १९८(१), ११८(२) व १०९ अंतर्गत देखील गुन्हा नोंद करणे आवश्यक होते”- उत्तम पवार,अध्यक्ष,एकलव्य संघटना कोपरगाव तालुका.
सदर घटनेबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याच्या नोंदीबाबत माहिती घेण्यासाठी एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते व ब्राम्हणगाव येथील आदिवासी समाजातील नागरिक शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक कुंभार यांना भेटण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्यांनी आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी अरेरावीची व उद्घट भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.न्याय मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवरच गुन्हा दाखल करण्याची भाषा करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान सदर प्रकरणात आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केलेला असताना देखील गुन्हा नोंद करताना पोलिस अधिकारी कुंभार यांनी फक्त भारतीय दंड संहिता कलम ३२४ व ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रत्यक्षात या प्रकरणात जीवे मारण्याचा प्रयत्न कलम ३०७ लागू होणे आवश्यक होते.तसेच विद्यमान भारतीय न्याय संहितेनुसार कलम १९८(१),११८(२) व १०९ अंतर्गत देखील गुन्हा नोंद करणे आवश्यक असल्याचा आरोप केला आहे.यामुळे आरोपीना संरक्षण मिळत असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली असल्याचा दावा केला आहे.कुंभार यांच्यासारखे अधिकारी पदाचा गैरवापर करून गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचे काम करत असून यामुळे आदिवासी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा केला आहे.
त्यांनी त्यासाठी आज कोपरगाव तहसील कार्यालयावर येऊन निवेदन दिले असून त्यात त्यांनी या प्रकरणी,”राहुल पवार याच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून गुन्ह्यात जीवे मारण्याचा प्रयत्न समाविष्ट करण्यात यावीत.हल्ला करणाऱ्या सर्व आरोपीना तात्काळ अटक करण्यात यावी.प्रकरणात योग्य कलमे न लावणे व नागरिकांशी अयोग्य वर्तन केल्याबद्दल पोलीस निरीक्षक कुंभार यांच्यावर विभागीय चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी.पीडित राहुल पवार याला संरक्षण व शासकीय मदत देण्यात यावी.सदर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून जीवे मारण्याचा प्रयत्न (कलम ३०७) यांसारखा गंभीर गुन्हा नोंदविण्यात यावा तसेच पोलीस निरीक्षक कुंभार यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.अन्यथा,प्रशासनाने याची तात्काळ दखल न घेतल्यास आगामी दि.४ मार्च रोजी आदिवासी समाजाच्या वतीने कोपरगाव येथे श्री साईबाबा कॉर्नर ते तहसिल कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी,अहिल्यानगर,शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी आदींना देण्यात आल्या आहेत.यावेळी बहुसंख्येने कार्यकर्ते,महिला उपस्थित होत्या.



