आंदोलन
शिर्डी ऐवजी लोणीच्या पर्यटनासाठी कुंभमेळ्याची मोठी आर्थिक तरतूद-…यांचा आरोप

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
सन-२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जोरदार तयारीला सुरुवात केली असून कुंभमेळ्यात देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने,वाहतूक व्यवस्थेसह संपूर्ण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी यात शिर्डीच्या वाहतूक व्यवस्थेचा भार कमी करण्यात महत्वाची भूमिका निभावणारा दुष्काळी भागातून जाणारा जवळके मार्गे शिर्डी रस्ता मुद्दामहून टाळला असून आगामी कुंभमेळ्यात शिर्डी ऐवजी लोणीच्या पर्यटनासाठी मोठी आर्थिक तरतूद केली असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख गंगाधर रहाणे यांनी नुकताच एका प्रसिध्दी पत्रकान्वये केला आहे.

“मुंबई,गुजरात वरून शिर्डीस येणाऱ्या साईभक्तास सर्वात जवळचा असणारा जवळके मार्गे शिर्डी या रस्त्यास अद्याप निधी मंजुर झाला असल्याचे कोणतेही आदेश आलेले नाही असे सांगून शिर्डीच्या गर्दीच्या काळात तळेगाव-दिघे मार्गे वळवल्या जाणाऱ्या वाहतूकीसाठी महत्वाचा असणाऱ्या झगडे फाटा-वडगाव पान या रस्त्यासाठी कोणतीही तरतूद झाली असल्याची मान्यता नाही”-वर्षराज शिंदे,उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,” सन-२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार असून त्या मेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.कुंभमेळ्यात देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने,वाहतूक व्यवस्थेसह संपूर्ण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नागपूरमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते.या बैठकीत या बैठकीत संभाजीनगर ते नाशिक,नागपूर ते नाशिक तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या विकासासंदर्भात चर्चा झाली आहे.या रस्त्यांसाठी निधी मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभ मेळाव्यापूर्वी केंद्र सरकारकडून एकूण नऊ रस्ते विकसित केले जातील अशी माहिती दिली आहे.प्राथमिक अंदाजानुसार,या कामासाठी ४००० कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.यासोबतच जळगाव जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

शिर्डीची उत्तरेकडून येणारी व नगरसह पुण्याला जाणारी अवजड वाहतूक गर्दीच्या काळात तळेगाव मार्गे वळवली जाते.त्यामुळे या रस्त्याची मोठी वाट लागली असून शेकडो नागरिकांचे त्यात बळी गेले आहे.वित्तीय नुकसानीची तर मोजदाद नाही.मात्र त्या झगडेफाटा ते वडगाव पान रस्त्याला एक फुटकी कवडीची तरतूद केलेली नाही त्यामुळे हा धार्मिक कुंभमेळा नाही तर लोणीच्या पर्यटनासाठी ही तरतूद झाली असल्याची टीका उत्तर नगर जिल्ह्यात होत आहे.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,“सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती राहणार असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्ते विस्तार अत्यंत महत्त्वाचा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रस्ते नेटवर्क वाढवण्याची विनंती करण्यात आली होती आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आठ मुख्य रस्त्यांच्या विकासास मंजुरी देण्यात आली असल्याची घोषणा त्यांनी त्यावेळी केली आहे.त्यात-घोटी-पहिणे-त्र्यंबकेश्वर-जव्हार फाटा,द्वारका सर्कल-सिन्नर IC 21 (समृद्धी एक्सप्रेसवे) नांदूर शिंगोटे-कोल्हार,नाशिक ते कसारा,सावळीविहीर IC 20 (समृद्धी एक्सप्रेसवे) शिर्डी-शनी शिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द),नाशिक ते धुळे,त्र्यंबकेश्वर-जव्हार-मनोर,सावळीविहिर-मनमाड-मालेगाव,शनी शिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द)-अहिल्यानगर (खरवंडी फाटा),आदींचा समावेश आहे.यात आणखी एक रस्ता असून त्यात घोटी-सिन्नर-वावी-शिर्डी या रस्त्याचा समावेश दाखवत असले तरी हा मार्गे नेमका कोणत्या गावावरून जाणारा आहे.याबाबत कोणालाही माहिती असल्याचे दिसत नाही.कारण वावी वरून शिर्डीला जाणारे दोन मार्ग असून एक देरर्दे -कोऱ्हाळे,झगडे फाटा हा दूरचा मार्ग असून दुसरा सर्वात जवळचा आणि वेळ आणि पैसा वाचविणारा मार्ग म्हणून सायाळे,बहादरपुर,जवळके मार्ग आहे.या मार्गासाठी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या मागणीनुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचेकडून सन-२०१६ साली १० कोटींचा निधी नगर जिल्ह्यात नाशिक हद्दीपासून काम करण्यासाठी आणला होता.हा मार्ग म्हणजे ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळाचा शेवटचा टप्पा म्हणून हा निधी त्यांनी दिला होता.मात्र प्रत्यक्षात तत्कालीन नाशिकचे खा.उत्तमराव ढिकले यांनी तो निधी वावी पासून हद्दीपासून वापरला होता.परिणामी हा शेवटचा शिर्डी विमानतळ जोडण्याचे काम केवळ वेस-सोयगाव पर्यंत झाले होते तर वेस पासून मल्हारवाडी मार्गे शिर्डी विमानतळाला जोडणारा जवळपास १० कि.मी.रस्ता तसाच बाकी राहून गेला होता.आता कुंभमेळ्यानिमित तरी या रस्त्याला निधी मिळेल अशी अपेक्षा या दुष्काळी भागातील ग्रामस्थांची होती मात्र ती सपेशल फोल ठरल्याचे दिसून येत आहे.निळवंडे कालव्यांबाबत कथनी आणि करणीचा भेद असलेली जी सपत्नपणाची वागणूक प्रस्थापित उत्तरेतील नेत्यांनी गेली ५५ वर्षे या दुष्काळी भागाला दिली ती अजूनही थांबलेली असल्याचे दिसून येत नाही.गरज नसताना नांदूर शिंगोटे या मार्गाला मोठा निधी मिळतो याचा अर्थ शिर्डी आणि शिर्डीचे जगभर प्रसिध्दी असलेले संत साईबाबा आता लोणीपेक्षा गौण गणले जात आहे असा होत आहे.

आता हेच बघा ना लोणी-कोल्हार (जुना नाशिक रस्ता) हा १३ किलोमीटरचा मार्ग शिर्डी विमानतळाला जोडण्यासाठी तीन पदरी केला जाणार असून,त्यासाठी ७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.या रस्त्यांच्या सुधारणेमुळे कुंभमेळ्याच्या काळात शिर्डी,शनी शिंगणापूर आणि नाशिकला येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडी टळेल असा पोकळ दावा केला आहे.त्यामुळे त्यांनी शिर्डीचे नाही तर लोणीचे कोटकल्याण केलं असल्याचे उघडपणे दिसून येत आहे.तीच बाब शिर्डी-नाशिक (निर्मळ पिंपरी-निमोण-नाशिक) या २२ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे चारपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या प्रकल्पासाठी राज्य सरकारने १६५ कोटी रुपये मंजूर केले असून त्यात तोच उद्देश स्पष्ट दिसून येत आहे.मात्र याबाबत कोणताही पक्ष आणि यांचे नेते तोंड उघडायला तयार नाही.
आणखी एक उदाहरण वानगी दाखल देता येईल त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नांदूर-शिंगोटे ते कोल्हार या ४७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी ३२६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.या प्रकल्पामुळे मुंबईहून काकडी विमानतळ मार्गे शिर्डीत येणाऱ्या भाविकांना लोणी-बाबळेश्वर मार्गे जाण्याऐवजी थेट आणि जलद मार्ग उपलब्ध होईल असा फोल दावा केला आहे.आता मुंबईहून येणारा साईभक्त हा सर्वात जवळचा वावी-जवळके मार्ग सोडून बाभळेश्र्वरला कशाला जाईल आणि कधी जात होता ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे कुंभमेळा आणि शिर्डीचे साईबाबा यांचे नावाखाली लोणी आणि आपल्या परिसराचे कोटकल्याण करण्याचे विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे डावपेच सरळसरळ उघड झाले आहे.त्यामुळे हा निधी वावी वरून जवळके मार्गे शिर्डीला वळता करावा अशी मागणी तालुका प्रमुख गंगाधर रहाणे यांनी शेवटी केली आहे.
दरम्यान शिर्डीची उत्तरेकडून येणारे व नगरसह पुण्याला जाणारी अवजड वाहतूक गर्दीच्या काळात तळेगाव मार्गे वळवली जाते.त्यामुळे या रस्त्याची मोठी वाट लागली असून शेकडो नागरिकांचे त्यात बळी गेले तर अनेक जायबंदी झाले आहे.वित्तीय नुकसानीची तर मोजदाद नाही.मात्र त्या झगडेफाटा ते वडगाव पान रस्त्याला एक फुटकी कवडीची तरतूद केलेली नाही त्यामुळे हा धार्मिक कुंभमेळा नाही तर लोणीच्या पर्यटनासाठी ही तरतूद झाली असल्याची टीका उत्तर नगर जिल्ह्यात होत आहे.याबाबत कोपरगावचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी अद्याप तोंड उघडलेले नाही हे विशेष !
दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधींने सार्वजनिक बांधकाम कोपरगाव उपविभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”मुंबई,गुजरात वरून शिर्डीस येणाऱ्या साईभक्तास सर्वात जवळचा असणारा जवळके मार्गे शिर्डी या रस्त्यास अद्याप निधी मंजुर झाला असल्याचे कोणतेही आदेश आलेले नाही असे सांगून शिर्डीच्या गर्दीच्या काळात तळेगाव दिघे मार्गे वळवली जाणाऱ्या वाहतूकीसाठी महत्वाचा असणाऱ्या झगडे फाटा-वडगाव पान या रस्त्यासाठी कोणतीही तरतूद झाली असल्याचे आदेश आलेले नाही” असे उत्तर दिले आहे.