आंदोलन
‘जननी जन्मभूमिश्च,स्वर्गादपि गरियसी’
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
वाढवण बंदराबाबत स्थानिकांच्या फसवणुकीचे नवे अध्याय समोर येत आहेत.नुकत्याच आलेल्या बातमीप्रमाणे,स्थानिक डायमेकर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची,बंदर प्रकल्पाच्या अध्यक्षांबरोबर बैठक झाली.या बैठकीत या डायमेकर्सना बंदराच्या गळाला लावण्यासाठी अनेक आश्वासने,प्रलोभने,आमिषे देण्यात आली असल्याची माहिती आहे.त्यामुळे सर्वांनी याबाबत ताबडतोब सावध होण्याची गरज आहे.
मुळात या भागात दागिन्यांचे साचे बनवण्याचा,डायमेकिंग हा उद्योग-व्यवसाय स्वयंप्रेरणेने विकसित करणारे ग्रामस्थ,हे खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहेत.त्यांच्या गावांतील घरात आणि पडवीत जपान,मध्यपूर्वेचे देश इत्यादींशी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहार करूनही,गावांच्या शांततामय जीवनाला आणि हिरव्यागार पर्यावरणाला धक्का न लावता अर्थार्जन करण्याची किमया त्यांनी साधली आहे.
ग्रामस्थांना या महाविनाश घडवणाऱ्या बंदर प्रकल्पाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणारे,त्यांना हे सांगत नाहीत की,”तुम्ही विस्थापित होणार आहात.तुमच्या घरा- गावांवर प्रकल्पाचा बुलडोझर फिरणार आहे. बांधवांनो,आपल्या शेकडो पिढ्यांना अंगाखांद्यावर खेळवणारा पालन पोषण करणारा डहाणूचा समुद्र आणि डहाणूची शेती, या बंदराच्या अनेक किलोमीटर्सच्या सुक्या-ओल्या गोद्यांच्या बांधकामात,रस्ते रेल्वेंच्या जाळ्यात,प्रचंड वेअरहाऊसच्या उभारणीत,कंटेनर्सच्या उलाढालीत,आगंतुकांच्या काॅलनीत आणि इतर अनेक विध्वंसक घडामोडीत पूर्ण उध्वस्त होणार आहे.आपणच जेथे हाकलले जाणार आणि परागंदा होणार,तेथे कुठले डायमेकिंग ? कुठली शेती आणि कुठली मच्छीमारी ? यांच्या भूलथापांना फसू नका.समुद्राजवळची शेकडो गावे,पाडे प्रत्यक्षरित्या आणि पूर्वेच्या डोंगररांगा,तेथील गावे बांधकाम साहित्यासाठी,अप्रत्यक्षरीत्या फेकली जाणार आहेत.
आपल्या आधीच्या पिढीने या प्रकल्पास का कसून विरोध केला, ते समजून घ्या.सर्वोच्च न्यायालयाने डहाणूच्या व त्याद्वारे देश आणि मानवजातीच्या रक्षणासाठी नेमलेल्या,
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारींच्या अध्यक्षतेखालील डहाणू प्राधिकरणाने सोळा तारखांना सुनावण्या घेऊन,सांगोपांग चिकित्सा करून,हा सर्व अभ्यासांनी नाकारलेला प्रकल्प, एकमताने फेटाळला आणि येणाऱ्या पिढीचे व पुढील पिढ्यांचे रक्षण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याला काळिमा फासण्याचा नतद्रष्टपणा अत्यंत अनैतिक पध्दतीने केला जात आहे.
आपल्या स्वाभिमानाला व सत्वाला हे आव्हान आहे.कोणत्याही बतावणीला,आमिषाला बळी पडाल तर आपल्या मुला नातवंडांचा घात कराल.हा सत्याशी,निसर्गाशी,ईश्वराशी द्रोह ठरेल.आपल्याकडे सागरात शंखोदर आहे.त्याचं नातं श्रीरामाशी आहे अशी येथील श्रध्दा आहे.प्रभू श्रीरामांनी म्हटले होते,
“अपि स्वर्णमयी लंका,
“न मे लक्ष्मण रोचते |
‘जननी जन्मभूमिश्च
‘स्वर्गादपि गरियसी ||
“लक्ष्मणा,जरी सोन्याची असली तरी लंका मला प्रिय नाही,माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे.
आणि हा आपल्या डहाणूच्या मातृभूमीचा निसर्ग तर खरेच काल्पनिक स्वर्गापेक्षा सुंदर आहे.याचा मोबदला कशातही होऊ शकत नाही.बंदर प्रकल्प हा सोन्याच्या हरणाचे रूप घेतलेला मायावी मारिच राक्षस आहे.त्याच्या मोहात कुणी फसू नये”असे आवाहन ऍड.गिरीश राऊत यांनी शेवटी केले आहे.
मोबाईल क्रमांक -98690 23127.