आंदोलन
निळवंडे श्रेयवाद्यांना शेतकऱ्यांनी काठ्या घेऊन पिटाळले…!
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यांची दुसरी चाचणी गत महिन्यातील १३ ऑगस्ट रोजी सुरु झाली असून ती अद्याप सूरु असली तरी तरी या कालव्यांचे श्रेय निर्विवादपणे निळवंडे कालवा कृती समितीचे असताना ‘या’ पाण्याचे श्रेय घेण्याची नगर उत्तरेतील राजकीय नेत्यांची आणि त्यांच्या लाळघोट्या कार्यकर्त्याची जुनी खोड काही गेलेली नाही.त्यामुळे तळेगाव दिघे शिवारात काही कार्यकर्त्यावर अनास्था प्रसंग गुदरला असून त्यांनी कालव्यानजीक जाऊन कालव्याचे पाणी फोडताना काही असंबद्ध साहेबांचा जयघोष केल्याने नजीकच्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर थेट लाठी हल्ला करत त्यांना परतवल्याने त्यांना आपला जीव मुठीत घेऊन पळावे लागले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”आगामी निवडणुका पाहून स्थानिक नेत्याच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२६ ऑक्टोबरला शिर्डीमध्ये येऊन त्यांच्या उपस्थितीत निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पणासह शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन,साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन,महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन,साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न केले आहे.मात्र यातील उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा कालवा १० तर उजवा कालवा २५ टक्के,वितरण व्यवस्था १०० टक्के अपूर्ण आहे.भूसंपादन अद्याप बाकी आहे.एकुणात हा प्रकल्प अद्याप जवळपास ३५ टक्के अपूर्ण असून त्यात निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर येथील खंडपिठात विक्रांत रुपेंद्र काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी अड्.अजित काळे यांचे सहकार्याने जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल केली होती त्यात सरकारने हा प्रकल्प ऑक्टोबर २०२२ अखेर पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर दिले होते.मात्र वेळोवेळी सहा मुदतवाढी देऊनही हा प्रकल्प जलसंपदा विभागाने पूर्ण केलेला नाही.त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढ घेऊन सदर डावा कालवा हा मार्च-२०२३ तर उजवा कालवा हा जून-२०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयासमोर दिले होते.मात्र त्यास जलसंपदा विभागाने त्या आदेशाला वारंवार केराची टोपली दाखवली आहे.त्यानंतरही दि.११ जुलै २०२२ ते ०५ जून २०२३ दरम्यान वारंवार सहा मुद्तवाढी घेऊनही त्या पाळल्या नाही.त्यामुळे समितीचे याचिकाकर्ते पत्रकार नानासाहेब जवरे व विक्रांत काले आदींनी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या मार्फत न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले होते.
त्या वेळी उच्च न्यायालयाचे न्या.रवींद्र घुगे व न्या.संजय देशमुख यांनी सरकारला वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याबाबत सक्त ताकीद दिली होती.उच्च न्यायालयाने सरकारला मुदतीत प्रकल्प पुर्ण न केल्याने दि.१३ जुलै २०२३ रोजी अवमानना नोटीस काढली व जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकार गोठवले आहे.तसेच अकोले तालुक्यातील चाचणीत डाव्या कालव्यांची मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होऊन अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने त्याची नागरपूर येथील,’पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था’ (मेरी) यांच्या तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली आहे.वारंवार मुदतवाढ देऊनही प्रकल्प पूर्ण न केल्याने न्यायालयाचा संताप झालेला असताना आधी ३१ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तर २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींच्या प्रमुख उपस्थितीत आगामी निवडणुका व मतपेट्या डोळ्यासमोर ठेऊन स्थानिक नेत्यांनी दोनदा जलपूजन करण्याची आपल्या कायमच्या सवयी प्रमाणे हौस भागवून घेतली आहे.वर्तमानात मोठा दुष्काळ आहे.शेतकऱ्यांना रब्बी पिकांना व पिण्यास पाणी शिल्लक नाही.चारा पिकांना पाणी उपलब्ध नाही.मे २०१९ रोजी अकोलेतील आ.वैभव पिचड व त्यांचे पिताश्री मधुकर पिचड आदींनी अकोलेतील काम गेली पन्नास वर्ष होऊ दिले नव्हते.त्यासाठी उत्तर नगर जिल्ह्यातील प्रवरा काठचे सर्वच नेते जबाबदार आहे.हे समितीचे वेळोवेळी उघड केले आहे.त्यात लोणी येतील स्व.नेते आणि त्यांचे मंत्री सुपुत्र नातू आदींचा विरोध लपून राहिलेला नाही.मे १९८४ साली पाणी परिषदेत निळवंडे कालव्यांना केलेला विरोध कम्युनिष्ट नेते स्व.दत्ता देशमुख,माजी मंत्री बी.जे.खताळ त्यांचेसह दुष्काळी जनतेसह सर्वांना माहिती आहे.तर संगमनेर येथील नेत्याने व माजी मंत्र्याने आपल्या कारखान्याजवळ व निळवंडे (संगमनेर) येथील भूसंपादन होऊ दिले नव्हते.दि.१० ऑगस्ट २०१४ रोजी खडकेवाके येथील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सभेत फळ प्रक्रिया उद्योगाचे उदघाटन प्रसंगी कालवा कृती समितीच्या शेतकऱ्यांवर पोलीस अधिकारी हाताशी धरून केलेला लाठी हल्ला सर्वश्रुत आहे.कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर असलेले गुन्हे मागे घेऊन नये यासाठी मंत्रालयीन पातळीवर संबंधित मंत्र्यांनी केलेल्या लीला जुन्या नाहीत.निळवंडेचे पाणी पळविण्यासाठी शिर्डी बंदिस्त जलवाहिणी विरुद्ध चालवलेला उच्च व सर्वोच्च न्यायालय पातळीवर समितीने अड्.अजित काळे यांच्या मार्फत केलेला लढा सर्वश्रुत आहे.व वर्तमानात तो सुरु आहे.तरीही हि मंडळी निळवंडे धरण आणि कालवे आम्ही केले म्हणत आपली पाठ थोपटण्याची एकही संधी सोडत नाही.एवढ्यावर थांबतील तर शपथ.त्यांनी स्वतःला,’जलपुरुष’,’जलदुत’,’जलनेता’काय काय उपाध्या लावल्या आहेत याची गणतीच नाही.मात्र हे काम कोणी केले हे जनतेला वेळोवेळी निळवंडे कालवा कृती समितीने गावोगाव जाऊन सप्रमाण दाखवून दिले आहे.त्यास अन्य पुराव्यांची गरज उरत नाही.तरीही मंडळी आपल्या मर्कट लीला थांबविण्याचे नाव घेत नाही.याचे मासलेवाईक उदाहरण नुकतेच समोर आले आहे.
त्याचे झाले असे की,”जलसंपदा विभागाने डाव्या कालव्यास पाणी सोडल्यानंतर सदर कालव्याद्वारे दुष्काळी जनतेची तहान भागविण्यासाठी विविध उपकालव्यात पाणी सोडून साठवण तलाव,पाझर तलाव,के.टी.वेअर आदी भरण्यास प्रारंभ केला.मात्र यात सर्वाधिक पुढे कोण असेल तर ज्यांनी या लढ्यात कधीही आपला पदस्पर्श केला नाही उलट या लढ्याची,”आणा पाटी फावडे” अशी म्हणून टिंगल केली.अशी मंडळी त्यात सामील होऊन आपल्या स्वार्थासाठी आपापल्या साहेबांचा जयजयकार करू लागली आहे.त्यामुळे स्थानिक ज्या लोकांनी,शेतकऱ्यांनी कालवा कृती समितीचे प्रयत्न पाहिले आहे अशा शेतकऱ्यांना राग आल्याशिवाय रहात नाही.अशीच घटना तळेगाव दिघे येथे घडली असून त्या ठिकाणी गावाच्या उत्तरेस संगमनेर-कोपरगाव रस्त्याच्या वायव्येस असलेल्या माजी उपसरपंच व समितीचे माजी उपाध्यक्ष रमेश दिघे यांच्या वस्तीजवळ कालवा फोडण्यास कोपरगाव तालुक्यातील प्रथितयश नेते मंडळींची काही कार्यकर्ते गेले असता त्यांनी त्या ठिकाणी ‘अमूक-अमुक’ साहेबांचा जय-जय-कार करण्यास सुरुवात केली असताना त्या ठिकाणी नजीक असलेल्या शेतकऱ्यांनी ‘त्या’ घोषणा ऐकल्या असता; त्यांनी थेट मागचा पुढचा विचार न करता जवळचे दांडे आणि बांबू घेऊन …’या’ घोषणा देणाऱ्यांचा बेत पाहण्यांच्या उद्देशाने पाठलाग केला असता त्यांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली आहे.त्यावेळी त्यांना पळता भुई थोडी झाली आहे.त्या शेतकऱ्यांनी पळता पळता त्या पळपुट्या कार्यकर्त्याना चांगलीच सुनावली असून,”ज्यांनी या प्रकल्पासाठी व कालव्यांसाठी लाठ्या काठ्या खाल्या,जेल मध्ये गेले,सर्वोच्च न्यायालय,उच्च न्यायालय आदींच्या स्व-खर्चाने पायऱ्या झिजवल्या ‘त्या’ निळवंडे कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांचे,न्यायिक लढ्यात ज्या अड्.अजित काळे यांनी मोलाची मदत केली त्यांची नावे घेण्याचे सोडून,”ज्यांनी गत ५३ वर्ष व तीन पिढ्या या प्रकल्पास खोडा घातला त्यांची नावे घेता लाज वाटत नाही”असे म्हणून खरी-खोटी सुनावली आहे.अखेर त्यांना आपले शेपूट गुंडाळून पळून जावे लागले आहे.त्यामुळे अ.नगर-नाशिक जिल्ह्यात या प्रकरणी प्रत्येक चौका-चौकात चविष्ट चर्चा सुरु आहे.