आंदोलन
समृद्धी विरोधात सुरू केलेले,’आमरण उपोषण’ अखेर मागे…?

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
समृद्धी महामार्गाच्या निर्मिती कामामुळे खराब झालेल्या इजीमा २१५ वारी धोत्रे रस्त्याचे डांबरीकरण काम तातडीने करणे कामी दि.३१ ऑगष्ट रोजी वारी ग्रामपंचायत समोर उपोषण सुरु केले होते त्यात उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे यांनी मध्यस्थी केली असून त्यात त्यांना यश आले असल्याची माहिती हाती आली आहे.

समृद्धी महामार्गाचे मार्ग उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे झाले.समृद्धी महामार्गाचे मार्ग उद्घाटन वायफळ टोलनाक्यावर झाले होते.त्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकमठाण येथे शिर्डी ते भरवीर या ८० कि.मी.दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन मोठया उत्साहात केले होते.मात्र या मार्गाने स्थानिक अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न,’जैसे थे’ आहेत.त्याला वारी येथील ग्रामस्थ आणि शेतकरी अपवाद नाही.महामार्गाचे काम सुरू असताना तब्बल अडीच वर्ष इजिमा २१५ वारी ते धोत्रे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होऊन रस्त्याची दुरावस्था झाली आहे.परिणामी विद्यार्थी,दूध उत्पादक शेतकरी वृध्द व महिलांच्या आरोग्याबाबत असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले होते.या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करून समृद्धी प्रशासनाने सदरचा प्रश्न सोडविला नाही.तात्पुरते खडीकरण केले ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाल्याने शेतकरी नागरिक त्रस्त होते.वारंवार पाठपुरावा करूनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी दाद देत नव्हते त्यामुळे समृद्धी महामार्गावर,’गाई सोडून आंदोलन करण्याचा इशारा उपोषण कर्त्यांनी दिला होता.
दरम्यान सदर परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी समृद्धी महामार्गाचे प्रकल्प अधिकारी राधेश्याम मोपलवार व सातपुते यांच्याशी संपर्क साधुन चर्चा केली तसेच स्थानिक अधिकारी शेख,सुमित वैद्य यांनी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे मान्य केल्याने तसेच नाशिक येथे डांबरीकरण संदर्भात लवकरच उपोषणकर्ते व अधिकारी अशी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे मान्य केले.यावेळी नायब तहसीलदार सातपुते मॅडम,मंडळ अधिकारी कोल्हे,तलाठी कदम,वारीचे प्रशासक साबळे,ग्रामविकास अधिकारी वारकर यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण कर्त्यांनी उपोषण सोडल्याचे जाहीर केले आहे.
सदर प्रसंगी आंदोलनकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य शेतकरी सेनेचे गोरख टेके,माजी सभापती मच्छिंद्र टेके,माजी सरपंच रावसाहेब टेके माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे,तान्हाजी थोरमिशे,बाबासाहेब थोरमिशे,तुषार वरकड,संजय थोरात,चांगदेव भुजाडे,अण्णा टेके,दत्तु ठोंबरे,शांताराम जाधव,स्वप्निल टेके,बाळासाहेब ठोंबरे यांचेसह जेष्ठ नेते नामदेव जाधव,अँड.शरद जोशी,बद्रीनाथ जाधव,विशाल गोर्डे,सरपंच सतिश कानडे यावेळी उपस्थित होते.
सदर उपोषणाची तातडीने दखल घेऊन स्थानिक अधिकाऱ्यांना उपोषण स्थळी पाठवून त्यांचे मार्फत रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे मान्य केल्याने अधिकारी शेख व जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांच्या हातून लिंबू पाणी घेऊन सदरचे उपोषण मागे घेण्यात आले आहे.