गुन्हे विषयक
अवैध वाळूउपसा,गुन्ह्यासह ०६ लाखांचा ऐवज जप्त!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पूर्वेस वाहणाऱ्या गोदावरी नदीचे बहुतांशी पात्र वाळूचोरांनी उजाड करून टाकले असताना त्यांची भूक थांबण्याचे नाव घेत नाही.अशीच एक घटना उघडकीस आली असून यात माहेगाव देशमुख येथे कुंभारी शिवरस्त्यालगत गोरोबानगर, कोपरगाव येथील आरोपी महेश अण्णा शेलार याचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा ०६ लाख रुपये किमतीचा निळ्या रंगाचा विना क्रमांकाचा स्वराज – ७४४ हा ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला आहे.त्यामुळे वाळूचोरांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान आज दाखल झालेल्या गुन्ह्यात अंचलगाव शिवारात दिनाक ०३ सप्टबर रोजी रात्री ८.३० नंतर अज्ञात चोरट्याने महावितरण कंपनीच्या विद्युत रोहित्रातील १० हजार रुपये किमतीचे ५० लिटर ऑइल व ३२ हजार रुपयांची तांब्याची तार असा एकूण ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचा गुन्हा येथील वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष पांडुरंग माने (वय ४५) यांनी तालुका पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात गंभीर गुन्ह्याचा आलेख सारखा वाढत आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत सातत्याने भर पडत आहे.मागील दिड वर्षापूर्वी शहरातील एक वकील,एक लेखापरीक्षक आणि एक डॉक्टर यांच्या एका रात्रीत तीन चारचाकी गाड्या (कार) चोरट्यांनी हातोहात लंपास केल्या होत्या.त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही.अन्य चोऱ्या,अवैध व्यवसाय,पुरवठा विभागातील राजरोस धान्य चोरी,वाळूचोर आणि त्यात सामील गुंड पोलिस आणि महसूल विभागास नाक खाजून दाखवत आहेत.गावठी कट्टे तर किराणा दुकानात सामान मिळावे असे सहज मिळत आहेत.या घटना पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये वाचावयास मिळत असत.पण त्याची पुनरावृत्ती आता महाराष्ट्रात आणि साखर पट्ट्यात आता सहज होत आहे.कोपरगाव शहर आणि तालुका त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळूचोरी आणि वाढलेला भ्रष्टाचार याने तालुका पोखरून निघाला आहे.माजी आ.अशोक काळे यांनी मंजूर करून आणलेला धारणगाव -कुंभारी पुलाजवळ कोणताही अदमास न पाहता त्याला वाळूचोरांनी सुरुंग लावला आहे.त्यामुळे याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच संतप्त कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी वाळूचोरी थांबली नाही तर अवैध वाळूचोरांच्या गाड्या आपण जाळून टाकू व त्यांना गोळ्या घालू असा रोखठोक इशारा २५ एप्रिल २०२५ रोजी दिला असल्याचे अनेकांच्या स्मरणात असेल.त्यानंतर अनेकाना या राणा भीमदेवी गर्जनेनंतर अनेकाना कोपरगाव शहर आणि तालुक्यात रामराज्य येणार असा भास झाला होता.मात्र गत पाच महिन्यात ना अवैध वाळू उपसा कमी झाला ना महसूल मधील भ्रष्टाचार कमी झाला.या उलट दोन्ही घटनांनी मोठ्या उमेदीने मोठी झेप घेतली असल्याचे वारंवार उघड होत आहे. दस्तुर खुद्द आ. आशुतोष काळे यांच्या नावाखाली माहेगाव देशमुख जवळ कुंभारी शिवेवर वाळूचोरांनी आपले नाक खाजवून दाखविण्यास मागेपुढे पाहिले नसल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधी यांच्या त्या पोकळ वल्गना ठरल्या आहेत. याचा प्रत्यय आजच आला असून या प्रकरणी आज दुपारी १.२५ वाजता अवैध वाळू उपसा करणारा वरील निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आज पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.या घटनेने वाळू चोरांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात गुन्हा अनुक्रमे नोंद २५५ /२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२)६२ प्रमाणे आरोपीविरुद्ध नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली नूतन पोलिस हे.कॉन्स्टेबल एम.बी.दहिफळे, श्री कुडके हे करीत आहेत.