अपघात
जलजीवन योजनेच्या कामात अपघात,दोन जखमी
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील धारणगाव,’जलजीवन मिशन योजने’चे चांदगव्हाण येथे जुनी टाकी पाडण्याचे काम जे.सी.बी.च्या सहाय्याने सुरु असताना आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात जे.सी.बी चालक सचिन गीते सह त्यांचा अन्य एक सहकारी जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना उघड झाली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,’हर घर जल’ या संकल्पनेसह,भारत सरकारने २०२४ पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले आहे.या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी दिले जात आहे. “१५ ऑगस्ट २०१९ रोजी जल जीवन मिशनची घोषणा झाल्यापासून,आतापर्यंत ०६ कोटींहून अधिक कुटुंबांना नळाच्या पाण्याची जोडणी देण्यात आली असल्याचा सरकारचा दावा आहे.या योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील धारणगाव प्रादेशिक नळ पाणी पूरवठा योजनेचे काम सुरु आहे.त्या अंतर्गत पाच गावांचा समावेश आहे.त्यात धारणगाव,मुर्शतपूर,चांदगव्हाण,जेऊर पाटोदा,हिंगणी आदी पाच गावांचा समावेश आहे.
त्यात चांदगव्हाण येथील मारुती मंदिराच्या जवळ पश्चिमेस एक साधारण १९९५-९६ साली,’अश्वरोध’ या योजनेतून सुमारे २५ हजार लिटर क्षमतेची बांधलेली पाण्याची उंच टाकी होती.’जलजीवन मिशन’ मध्ये सदर गावात नवी योजना जीवन प्राधिकरण यांचे मार्फत मंजूर झालेली आहे.त्या अंतर्गत जुनी टाकी पाडून त्या जागी नवीन टाकी बांधवयाची असल्याने व त्यास नवी जागा नसल्याने ग्रामपंचायतीने जुनी टाकी पाडण्याचा निर्णय घेतला होता.व त्यासाठी संजीवनी अभियांत्रिकी विभागाची तपासणी केली असल्याची माहिती हाती आली आहे.
सदरचे काम हे जीवन प्राधिकरण कोपरगाव उपविभाग यांचे मार्फत,गुजरात येथील ठेकेदार,’जयंती सुपर कन्स्ट्रक्शन’ या कंपनी कडे सोपवले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाची परवानगी घेऊन सदर टाकी पाडण्याचे काम आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सुरु होते.सदरचे काम संबंधित ठेकेदाराने एका जे.सी.बी.च्या सहाय्याने सुरु केले असताना त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे तांत्रिक सहाय्य न घेता काम केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून त्यांनी थेट जे.सी.बी.च्या सहाय्याने त्यास पाडण्याच्या आततायी प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे.त्यातून सदर टाकी हि थेट जे.सी.बी.या सयंत्रावर कोसळली आहे.त्यात जे.सी.बी.खाली दाबला गेला असून त्यावरील चालक सचिन गीते हा सापडला असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.दरम्यान त्याच्या बरोबर एक अन्य सहकारी असल्याची माहिती आहे.त्याचा पाय मोडला असून तो बेपत्ता असल्याची माहिती आहे.
सदर ठिकाणी ग्रामपंचायतीची पाणी शुद्धीकरण प्रकल्प असून सुदैवाने दूपार असल्याने त्या ठिकाणी कोणी महिला अथवा पुरुष नसल्याने मोठी जीवित हानी टळली आहे.त्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे पर्यवेक्षक अधिकारी तथा कनिष्ठ अभियंता कोण होते व ते उपस्थित होते की नाही हि माहिती अद्याप समजली नाही.
दरम्यान सदरचा अपघात झाल्यावर नजीकचे ग्रामस्थानीं घटनास्थळी धाव घेतली असून सदर चालकास कसेबसे बाहेर काढले असून त्यास प्रथम कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता त्यास तेथे उपचार करण्यास नकार दिला आहे.त्यास शिर्डी कडे रवाना केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे या कामात कोणी हयगय केली असा सवाल निर्माण झाला आहे.