सिंचन
निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील पाझरतलाव पिण्याचे पाणी सोडा -मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या दमदार पावसाची हजेरी लागली असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.मुसळधार पावसाने राज्यातील धरणांमधला पाणीसाठा वाढला आहे.आज राज्यातील एकूण धरणे 62.89% भरली आहेत.नाशिक आणि अ.नगर जिल्ह्यातील धरण आणि बंधारे बहुतांशी भरल्याने त्यांच्यामधून काल सकाळपासून विसर्ग सुरू आहे.भंडारदरा आणि निळवंडे धरण त्यास अपवाद नाही त्यामुळे आगामी कालखंडात परिणामी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी जाणार आहे.त्यामुळे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या दुष्काळी 182 गावांतील माणसे आणि पशुधनाची तहान भागविण्यासाठी पाझर तलाव ताबडतोब भरून द्यावे अशी रास्त मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे उपाध्यक्ष सोन्याबापू ऊऱ्हे (सर) यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी गत महिन्यातील १४ जुलै रोजी ५४ वर्ष उलटली असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून पाचव्या सु.प्र.मा.०५ हजार १७७ कोटींवर गेला आहे.यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने सातत्याने कागदपत्रीय व उच्च न्यायालयात याचिकाकर्ते नानासाहेब जवरे,रुपेंद्र काले आदींनी ऍड.अजित काळे यांच्या साहाय्याने न्यायिक पाठपुरावा,कालवा कृती समितीने रस्त्यावरील संघर्ष करून मागील वर्षी ३१ मे २०२३ रोजी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना जलपूजन करण्यात भाग पाडले आहे.अद्याप या प्रकल्पाचे अनेक कामे बाकी असताना स्थानिक उत्तर नगर जिल्ह्यातील काँग्रेसी तथा भाजपात जाऊन शेंदूर फासलेल्या काही नेत्यांनी केंद्र व राज्य पातळीवरील बड्या नेत्यांची दिशाभूल करून तीन पिढ्या या प्रकल्पास विरोध करून स्वतःची जलपूजनाची हौस भागवून घेतली आहे व कलंक शोभा मिरवून कोळ्याच्या जाळ्यासारखे स्वतःचं निर्माण केलेल्या जाळ्यात अडकले आहे.
दरम्यान गतवर्षी निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडीत सोडून दुष्काळी शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.त्याची किंमत त्यांनी नगर लोकसभा निवडणुकीत चुकवली असल्याचे उघड झाले आहे.या वर्षी लाभक्षेत्रातील एस्केप आणि पाणी सोडण्याचे शिर्षस्थ फाटके पूर्ण झालेले आहे.त्यामुळे लाभक्षेत्रात असलेल्या पाझर तलावात पाणी सोडणे सोपे जाणार आहे.कालवा कृती समितीच्या पाठपुराव्याने जलसंपदा विभागाने दिनांक 31 जुलै व 05 ऑगस्ट 2024 रोजी डाव्या उजव्या कालव्याच्या सुमारे 852 कोटींच्या वितरण पाईप चाऱ्यांच्या निविदा प्रसिद्ध केल्या असून आगामी तीन वर्षात सदर काम सर्वात आधुनिक पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे.तो पर्यंत या दुष्काळी गावांची माणसांची व पशुधनाचा चारा आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी या गावातील पाझर तलाव भरणे गरजेचे आहे.मागील वर्षी काही गावातील तलाव भरले मात्र काही गावे वंचित राहिली होती.त्यामुळे त्यांना टंचाईचा सामना करावा लागला होता.मद्य सम्राटांनी गत वर्षीही निळवंडे धरणातून उर्वरित साडे तीन टी.एम.सी.पाणी समन्यायीच्या नावाखाली जायकवाडीस काढून दिले व आपल्या दारू कारखान्यासाठी भंडारदऱ्याचे पाणी शाबूत ठेवले होते.ही गंभीर बाब उघड झाली होती.ही बाब कालवा कृती समिती व शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले आहे.या वर्षी या पाणी चोर नेत्यांनी आणि त्यांना बळी पडून अधिकाऱ्यांनी हे उद्योग केले तर त्यांच्या अंगलट येणार आहे.त्यांनी नसते उद्योग करू नये असे आवाहन कालवा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केले आहे.त्यामुळे जलसंपदा विभागाने कोणाच्या दबावात न येता संगमनेर,कोपरगाव,राहाता,राहुरी,सिन्नर आदी तालुक्यातील दुष्काळी182 गावांतील पाझर तलावात सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही शेवटी निळवंडे कालवा कृती समितीचे उपाध्यक्ष सोन्याबापू ऊऱ्हे (सर) यांनी शेवटी केली आहे.